धरणग्रस्तांच्या त्यागातून दुष्काळी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी! बामणोलीच्या विकासात सुधीर गाडगीळ यांचे योगदान महत्त्वाचे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
धरणग्रस्तांच्या त्यागातून दुष्काळी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी! बामणोलीच्या विकासात सुधीर गाडगीळ यांचे योगदान महत्त्वाचे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
कुपवाड | प्रतिनिधी
कोयना धरणासाठी घरदार, शेती आणि गावाचा त्याग करणाऱ्या बामणोलीच्या ग्रामस्थांचे योगदान महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही. धरणग्रस्तांच्या त्यागामुळेच दुष्काळी भागातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनात पाण्याच्या माध्यमातून समृद्धी आली आहे. त्यामुळे पुनर्वसित बामणोलीचा इतिहास आणि ग्रामस्थांचा त्याग प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले.
आमदार पडळकर म्हणाले, धरणाच्या उभारणीसाठी बामणोलीतील ग्रामस्थांना आपली घरे, शेती, मंदिरे, शाळा आणि गावातील सामाजिक नाती मागे सोडून विस्थापन स्वीकारावे लागले. पुनर्वसनाच्या काळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ग्रामस्थांनी जिद्द आणि कष्टाच्या जोरावर नव्याने गाव उभे केले. त्यांच्या त्यागामुळे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. धरणग्रस्तांचे हे ऋण कायम स्मरणात ठेवले पाहिजे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले, सुधीर गाडगीळ यांनी राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी केला आहे. गेल्या बारा वर्षांपासून बामणोलीच्या विकासासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच स्वतःच्या खर्चातूनही विकासकामांना हातभार लावला. श्री भैरवनाथ मंदिराच्या जीर्णोद्धारासाठीही त्यांनी विशेष पुढाकार घेतला. गावाच्या विकासासाठी त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरपंच गीता चिंचकर यांनी स्वागत केले. माजी सरपंच सावळाराम चिंचकर यांनी प्रास्ताविक केले. ग्रामपंचायत सदस्य प्रकाश घुटुकडे आणि किरण भोसले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बामणोली ग्रामपंचायतीच्या वतीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, दिनकर तात्या पाटील आणि सत्यजित देशमुख यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन नागरी सत्कार करण्यात आला.
दरम्यान, भैरवनाथ स्पोर्ट्स फाऊंडेशनची खेळाडू ऋतुजा रामचंद्र माने हिने राष्ट्रीय मैदानी स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज पाटील, शिवसेनेचे बजरंग पाटील, सुभाष चिंचकर, ग्रामपंचायत सदस्य किरण भोसले, प्रकाश घुटुकडे, राजेश संनोळी, संतोष सरगर, दिग्विजय चिंचकर, उमेश वारणकर यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, अधिकारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच विष्णू लवटे यांनी आभार मानले.

No comments: