Header Ads

शेतातील विद्युत केबल चोरणाऱ्या तिघांना बेड्या! कुरुंदवाड पोलिसांची धडक कारवाई; १५ हजारांची २६० मीटर केबल जप्त

 शेतातील विद्युत केबल चोरणाऱ्या तिघांना बेड्या!कुरुंदवाड पोलिसांची धडक कारवाई; १५ हजारांची २६० मीटर केबल जप्त.


गौरवाड | प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत मोटारींच्या केबलवर डल्ला मारणाऱ्या चोरट्यांना कुरुंदवाड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. गौरवाड येथील कृष्णा नदीकाठावरील शेतातून विद्युत मोटारीची केबल चोरणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून सुमारे १५ हजार रुपये किमतीची तब्बल २६० मीटर लांबीची काळ्या रंगाची केबल जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरवाड येथील पवनकुमार तातोबा कुंभोजे (वय ३५) यांच्या गट क्रमांक ४२ मधील शेतात ही चोरी झाली होती. दि. १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५ ते १८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी विद्युत मोटारीची केबल कापून लंपास केली होती. याप्रकरणी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत महत्त्वाची माहिती मिळाली. त्यानुसार किरण दुंडाप्पा कांबळे (वय ३१, शिरोळ), इंद्रसेन विनोद कांबळे (वय १९, अर्जुनवाड) आणि अमर लहू कांबळे (वय ३८, कनवाड) या तिघांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, चौकशीत त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यांच्याकडून चोरीची २६० मीटर केबल जप्त करण्यात आली.

अटक केलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली.

ही कारवाई पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड व पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानदेव सानप, सहाय्यक फौजदार राजेंद्र इटासपुजारी, पोलीस नाईक संतोष साबळे व पोलीस अंमलदार नितीन साबळे यांनी केली.

शेतकऱ्यांच्या शेतीपंपांच्या केबल चोरीला आळा घालण्यासाठी कुरुंदवाड पोलिसांची ही कारवाई महत्त्वपूर्ण ठरली आहे.

No comments:

Powered by Blogger.