Header Ads

सावळी येथे उसाच्या ट्रॉलीचा टायर फुटून भीषण अपघात; बीड जिल्ह्यातील ४० वर्षीय तरुणाचा मृत्यू

 सावळी येथे उसाच्या ट्रॉलीचा टायर फुटून भीषण अपघात; बीड जिल्ह्यातील ४० वर्षीय तरुणाचा मृत्यू.


कुपवाड / मिरज (प्रतिनिधी):

सावळी (ता. मिरज) येथील आरटीओ ऑफिसजवळील मजलेकर कोल्ड स्टोरेज परिसरात उसाच्या ट्रॉलीचा टायर अचानक फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात ४० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अमोल मुजा मिसाळ (वय ४०, मूळ रा. कोल्हेवाडी, पो. लहूर, जि. बीड; सध्या रा. सावळी, ता. मिरज) असे या मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (दि. २९ नोव्हेंबर २०२६) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल मिसाळ हे कामानिमित्त सावळी येथे वास्तव्यास होते. रविवारी सकाळी ११ वाजता सावळी येथील आरटीओ ऑफिसजवळ असलेल्या मजलेकर कोल्ड स्टोरेज परिसरात उसाच्या ट्रॉलीचा टायर मोठ्या आवाजासह अचानक फुटला. या टायरचा जोरदार फटका अमोल यांच्या तोंडाला बसल्याने ते गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळले.

घटनेनंतर त्यांचे नातेवाईक विठ्ठल शिंदे यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दुपारी १२.३० वाजता दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर राऊत यांनी तपासणीअंती दुपारी १२.४० वाजता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

याप्रकरणी सिव्हिल हॉस्पिटलचे सीएमओ डॉ. सागर राऊत यांनी दिलेल्या वर्दीवरून एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद (रजि. क्र. १०५/२०२६) करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या घटनेचा पुढील प्राथमिक तपास पोलीस हवालदार मुळीक (बक्कल क्र. १८१५) व पोलीस कॉन्स्टेबल भांबुरे (बक्कल क्र. २५७) करत आहेत.

No comments:

Powered by Blogger.