राधानगरी पंचायत समितीत सागर भावके यांना स्वीकृत सदस्यपद द्या! ग्रामस्थांची जोरदार मागणी; ए. वाय. पाटील यांची घेणार भेट
राधानगरी पंचायत समितीत सागर भावके यांना स्वीकृत सदस्यपद द्या! ग्रामस्थांची जोरदार मागणी; ए. वाय. पाटील यांची घेणार भेट.
राधानगरी | प्रतिनिधी विजय बकरे
राधानगरी पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कोल्हापूर जिल्हा युवक सरचिटणीस सागर रवींद्र भावके यांच्या नावाची शिफारस करावी, अशी मागणी राधानगरी तालुक्यातील ग्रामस्थांकडून होत आहे. यासंदर्भात ग्रामस्थांचे शिष्टमंडळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ए. वाय. पाटील यांची सोमवारी भेट घेणार असल्याचे समजते.
सागर भावके हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हा युवक सरचिटणीस असून, एस. बी. सामाजिक व शैक्षणिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष आहेत. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.
राधानगरी तालुक्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकरी, युवक आणि शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.
पक्षनिष्ठा, संघटनात्मक कार्य आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन सागर भावके यांना पंचायत समितीच्या स्वीकृत सदस्यपदाची संधी द्यावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व समर्थकांकडून व्यक्त होत आहे.
स्वीकृत सदस्य म्हणून संधी मिळाल्यास राधानगरी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांनी व्यक्त केला आहे. आता पक्षश्रेष्ठी ग्रामस्थांच्या या मागणीला कितपत सकारात्मक प्रतिसाद देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

No comments: