वाघुर्डे येथे भव्य किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न; १३ वर्षांची परंपरा कायम
वाघुर्डे येथे भव्य किल्ला स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न; १३ वर्षांची परंपरा कायम
कळे प्रतिनिधी :
साईश मोळे
९५९५३१६२६६
श्री समर्थ बहुउद्देशीय सामाजिक संस्था, मरळीचे सदस्य व वॉटरप्रुफिंग स्पेशालिस्ट श्री सुरेश शंकर नाईक (बापू) यांच्या वतीने आयोजित 'भव्य किल्ला स्पर्धा सन २०२६ व बक्षीस वितरण सोहळा' रविवार, दि. २२ नोव्हेंबर २०२६ रोजी सायं. ६.०० वा. नरहरी देवालय, वाघुर्डे, ता. पन्हाळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
प्रेरणादायी जीवनसंघर्षातून २६ वर्षे समाजसेवा व सलग १३ वर्षे किल्ला स्पर्धा आयोजनाची परंपरा जपणारे आयोजक सुरेश नाईक (बापू) यांच्या या उपक्रमाला यंदाही चिमुकल्या मावळ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. 'ओळख दुर्गम किल्ल्यांची मावळे आम्ही वाघुर्ड्याचे' या ब्रीदवाक्याखाली झालेल्या या स्पर्धेत बालगोपाळांनी सुबक, हुबेहूब किल्ले साकारून उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्यात पन्हाळा-करवीर-गगनबावडा मतदार संघाचे आमदार मा. श्री चंद्रदिप नरके व शिवसेना गटनेता, कोल्हापूर महानगरपालिका नगरसेवक रिंकू देसाई यांचे सुपुत्र ,पन्हाळा पंचायत समिती सभापती श्री रवि पाटील, शिवसेना पन्हाळा तालुका प्रमुख श्री अरुण पाटील, वाघुर्डे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, वाघुर्डे देवस्थान कमिटी, श्रीकृष्ण दूध संस्था, तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सर्व स्पर्धकांचे सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच गेल्या ४० ते ५० वर्षे अखंड चालू असलेले सामाजिक कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते, देवस्थान कमिटी, भजनी मंडळ, गावातील सर्व तरुण मंडळे व संस्था यांचाही सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. 'एकच ध्यास मुक्या जनावरांना भरपूर घास' या उपक्रमात १३ वर्षे काम करणाऱ्या सेवेकऱ्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.तसेच हिंगोली येथे झालेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रा. प्रकाश पाटील यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
आयोजक सुरेश शंकर नाईक (बापू) यांनी सर्व सहकार्य करणाऱ्या अयोध्या डेव्हलोपर्स अँड बिल्डर्स, खतेंद्र मार्केटिंग व खतेंद्र वितरक ग्रुप, पी. के. बिर्याणी ग्रुप, मराठा ग्रुप, तातोबा ग्रुप, नवभारत ग्रुप, ओपन चॅलेंज, शिव प्रतिष्ठान मंडळ, तिरुपती ग्रुप व सर्व ग्रामस्थ, वाघुर्डे यांचे आभार मानले.

No comments: