अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार; राधानगरीत २८ वर्षीय तरुणावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल!
अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार; राधानगरीत २८ वर्षीय तरुणावर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल!
फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी; चक्रेश्वरवाडीच्या माळावर नेऊन अत्याचार केल्याचा आरोप.
राधानगरी | प्रतिनिधी. विजय बकरे
अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्यावर दबाव टाकणे, फोटो व्हायरल करण्याची तसेच जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी हलसवडे येथील गजानन नानिंदर गडवेकर (वय २८) याच्याविरोधात राधानगरी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलीचा पाठलाग करून शिट्टी मारत असे. मुलीने त्याला स्पष्ट नकार देऊनही त्याने तिच्यावर संपर्कासाठी दबाव टाकला. तसेच फोन न केल्यास दोघांचे प्रेमसंबंध असल्याची बदनामी करण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.
दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन दुचाकीवरून चक्रेश्वरवाडी येथील माळावर नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध जवळीक साधत किस केल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर दि. १७ नोव्हेंबर रोजी फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देऊन पुन्हा त्याच ठिकाणी नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४, ७८, ७९, ३५१(३) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO) २०१२ च्या कलम ४, ८, १२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक खोत करीत आहेत.
अल्पवयीन मुलीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे.

No comments: