Header Ads

३१ डिसेंबरच्या जल्लोषाचा शेवट मृत्यूत! गांधीनगरच्या तरुणाचा सादळे–मादळेत संशयास्पद अंत अपघात, अति मद्यसेवन की घातपात? मृत्यूने उभे केले अनेक प्रश्न.

 ३१ डिसेंबरच्या जल्लोषाचा शेवट मृत्यूत!

गांधीनगरच्या तरुणाचा सादळे–मादळेत संशयास्पद अंत

अपघात, अति मद्यसेवन की घातपात? मृत्यूने उभे केले अनेक प्रश्न.

-------------------

शशिकांत कुंभार .

----------------------

गांधीनगर | दि. १ जानेवारी २०२६ :

नववर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडलेल्या गांधीनगर येथील एका तरुणाचा सादळे–मादळे परिसरात गूढ परिस्थितीत मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ३१ डिसेंबरच्या पार्टीसाठी गेलेला हा तरुण रस्त्याकडेला मृतावस्थेत आढळून आला असून, हा मृत्यू अपघाताने झाला की अति मद्यसेवनामुळे की घातपाताने, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

मृत तरुणाचे नाव रोहन हिरालाल निरंकारी (वय ३७) असे असून तो करवीर तालुक्यातील गांधीनगर येथील कुटिया मंदिराजवळील हरे माधव अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास होता. नववर्षाच्या पूर्वसंध्येला तो आपला मित्र निखिल मोहन चावला याच्यासोबत नव्याने घेतलेल्या ज्युपिटर दुचाकीवरून सादळे–मादळे येथील एका फार्म हाऊसवर पार्टीसाठी गेला होता. त्या ठिकाणी दोघांनीही अति मद्यसेवन केल्याची प्राथमिक माहिती आहे.

पार्टी आटोपल्यानंतर घरी परतत असताना मादळे गावात बाळासाहेब पाटील यांच्या घराजवळ रोहन अचानक रस्त्याच्या कडेला पडला. त्याचा मित्र निखिल चावला याने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला; मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने तो पुन्हा फार्म हाऊसवर जाऊन झोपल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, भजन कार्यक्रम आटोपून घरी परतणाऱ्या ग्रामस्थांनी रोहनला रस्त्याकडेला पडलेले पाहिले. त्यांनी त्याला उठवण्याचा प्रयत्न केला असता तो हालचाल करत नसल्याचे लक्षात आल्याने तत्काळ शिरोली एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रोहनला तातडीने कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, अति मद्यसेवन, अपघात किंवा संभाव्य घातपात या तिन्ही शक्यतांचा तपास सुरू आहे.

नववर्षाच्या जल्लोषावर विरजण घालणाऱ्या या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत असून, शिरोली एमआयडीसी पोलीस शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करणार आहेत.

No comments:

Powered by Blogger.