नववर्षाच्या पहिल्याच पहाटे मृत्यूचा कहर! कोल्हापुरात मद्यधुंद इनोव्हाने तिघांना चिरडले तावडे हॉटेल चौकात थरार; तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी दारू पिऊन भरधाव गाडी; शाहूपुरी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल
नववर्षाच्या पहिल्याच पहाटे मृत्यूचा कहर!
कोल्हापुरात मद्यधुंद इनोव्हाने तिघांना चिरडले
तावडे हॉटेल चौकात थरार; तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
दारू पिऊन भरधाव गाडी; शाहूपुरी पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल.
---------------------कोल्हापूर | प्रतिनिधी :
नववर्षाच्या स्वागताच्या जल्लोषात कोल्हापुरात मृत्यूने थेट धडक दिली. शहरातील तावडे हॉटेल चौकात पहाटेच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा कारने रस्त्याच्या कडेला असलेल्या नागरिकांना अक्षरशः चिरडले. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला असून संपूर्ण शहर हादरले आहे.
दि. १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजता तावडे हॉटेल येथील बस स्टॉपजवळ हा थरार घडला. आरोपी चालक मुकेश अरूण अहीरे (वय २९) याने दारू पिऊन आपल्या ताब्यातील टोयोटा इनोव्हा (एमएच ०४ ईटी ८९७९) ही गाडी बेदरकारपणे, अतिवेगात आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवली. याच वेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांना कारने जोरदार धडक दिली.
या भीषण धडकेत
दिलीप आण्णाप्पा पवार (६५, गांधीनगर),
सुधीर कमलाकर कांबळे (४०, सांगली)
आणि
विनयसिंह राजकरणसिंह गोंड (२७, मध्यप्रदेश)
हे तिघे गंभीर जखमी होऊन जागीच मृत्युमुखी पडले.
या अपघातात नवला नारायण शेळके (४५, कागल) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
अपघात इतका भीषण होता की मृतदेह रस्त्यावर दूरवर फेकले गेले. काही क्षणांतच परिसरात एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन कारवाई सुरू केली.
या प्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक २०/२०२६ अन्वये बीएनएस आणि मोटार वाहन कायद्यानुसार गंभीर कलमे लावून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मद्यधुंद वाहनचालकांमुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात असल्याने शहरभर संतापाची लाट उसळली असून, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेने कोल्हापुराचा आनंद क्षणात शोकात बदलला आहे.

No comments: