नववर्षाच्या पहिल्याच पहाटे मृत्यूचा थरार! कोल्हापुरात भरधाव इनोवाने तिघांना उडवले तावडे हॉटेल चौकात भीषण अपघात; तिघांचा जागीच अंत.
नववर्षाच्या पहिल्याच पहाटे मृत्यूचा थरार!
कोल्हापुरात भरधाव इनोवाने तिघांना उडवले
तावडे हॉटेल चौकात भीषण अपघात; तिघांचा जागीच अंत.
-----------------------शशिकांत कुंभार .
-------------------------
कोल्हापूर :
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरात काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. शहराच्या प्रवेशद्वारावर असलेल्या तावडे हॉटेल चौकात आज पहाटे सुमारे पाचच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या इनोवा कारने तिघांना अक्षरशः चिरडले. या भीषण अपघातात तिघेही जण जागीच ठार झाले.
नववर्षाच्या स्वागतासाठी शहर सजलेले असतानाच मृत्यूने थेट दार ठोठावल्याची भावना या घटनेमुळे व्यक्त होत आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रस्त्याच्या कडेला तीन व्यक्ती थंडीपासून बचावासाठी शेकोटी पेटवून शेकत बसल्या होत्या. याच वेळी वेगाच्या अतिरेकामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि इनोवा कार थेट त्या तिघांवर धडकली.
धडक इतकी भीषण होती की तिघांचे मृतदेह रस्त्यावर दूरवर फेकले गेले. अपघातानंतर काही क्षणांतच परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी धाव घेतली; मात्र तिघांचा जागीच मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले.
घटनेची माहिती मिळताच शाहूपुरी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांची ओळख अद्याप पटलेली नसून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.
नववर्षाच्या पहिल्याच पहाटे घडलेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भरधाव वाहनांवर नियंत्रण ठेवण्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण, वाहनचालकाची अवस्था आणि वेगाबाबत सखोल तपास सुरू आहे.

No comments: