सातारा शहरात कुरीयरवरील दरोडा उघड; २१ तोळे सोनेसह ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
सातारा शहरात कुरीयरवरील दरोडा उघड; २१ तोळे सोनेसह ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
--------------------------------
सातारा,प्रतिनिधी
अमर इंदलकर
--------------------------------
दि. २८ फेब्रुवारी २०२६ () – सातारा शहरात कुरीयरमार्फत २१ तोळे सोने घेऊन जाणाऱ्या इसमास अडवून मारहाण करत सोने लुटणाऱ्या मध्यप्रदेशातील पाच जणांच्या टोळीला अवघ्या १२ तासांत अटक करण्यात सातारा शहर डी.बी. पथकाला यश आले. आरोपींकडून चोरीचे सर्व सोने, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी व मोबाईल असा एकूण सुमारे ४५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दि. २८/०२/२०२६ रोजी रात्री सुमारे १२.३० वाजता सातारा शहरातील पंचायत समितीसमोर कुरीयर कंपनीमार्फत सोने घेऊन जाणाऱ्या इसमास चारचाकीतून आलेल्या चौघांनी अडवून मारहाण केली. त्यानंतर त्याच्याजवळील सोन्याची बॅग जबरदस्तीने हिसकावून आरोपी फरार झाले. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के व पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांनी डी.बी. पथकास तपासाच्या सूचना दिल्या.
डी.बी. पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढत त्यांच्या वाहनाचा पाठलाग केला. आरोपी जिल्ह्याबाहेर पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर पुढील पोलीस ठाण्यांना कळवून नाकाबंदी करण्यात आली. पाठलाग सुरू असताना शिरपूर (जि. धुळे) येथील पोलिसांच्या मदतीने आरोपींना ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून चोरीचे सर्व सोने, गुन्ह्यातील चारचाकी वाहन व मोबाईल असा सुमारे ४५ लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. सातारा शहर डी.बी. पथकाने जलद गतीने तपास करत परराज्यात पळ काढणाऱ्या आरोपींना १२ तासांत जेरबंद करून गुन्हा उघडकीस आणला.
या कारवाईत डी.बी. पथक व सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने तसेच शिरपूर शहर पोलिसांनी मोलाची मदत केली. पुढील तपास सातारा शहर पोलीस ठाणे करीत आहे.

No comments: