कुपवाड एमआयडीसीत गावठी पिस्टलसह तरुण अटकेत.
कुपवाड एमआयडीसीत गावठी पिस्टलसह तरुण अटकेत
------------------------------------------
मिरज तालुका प्रतिनिधी
राजु कदम
-------------------------------------------
सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी परिसरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या तरुणाला पोलीसांनी अटक केली आहे. आरोपीकडून गावठी पिस्टल व जिवंत काडतुसे असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. २३ मार्च रोजी सकाळी एमएसईबी कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या बंद पडलेल्या वेस्ट वॉटर प्लांटसमोर संशयित इसम उभा असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले.
तपासादरम्यान आरोपीची ओळख वालचंद मारुती आंधळे (वय २२, रा. दत्तनगर, बामणोळी, ता. मिरज, जि. सांगली) अशी पटली. त्याच्या अंगझडतीत कमरेला लावलेले गावठी पिस्टल, एक मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली.
पोलीसांनी सुमारे ५१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी आर्म अॅक्ट तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे पिस्टल त्याने कुणाकडून मिळवले याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप पुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना चारवकर व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.

No comments: