आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महसूल कामकाज गतीमान करा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे महसूल कामकाज गतीमान करा : पालकमंत्री चंद्रकांत पाटील.
--------------------------------------
मिरज तालुका / प्रतिनिधी राजू कदम.
-----------------------------------------
शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेऊन ग्राम महसूल अधिकाऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत पारदर्शक व गतीमान कामकाज करावे, असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जमाबंदी आयुक्त व संचालक, भूमी अभिलेख यांच्याकडून प्राप्त लॅपटॉप व प्रिंटर्सचे ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकाऱ्यांना प्रातिनिधिक वितरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्रा, अपर जिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, मिरज उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव, तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, लिना खरात, अश्विनी वरुटे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पाटील म्हणाले, ई-सातबारा, ऑनलाइन फेरफार नोंदी, ई-चावडी आणि ई-पाहणी यांसारख्या सुविधा सुरू करून महसूल कामकाज अधिक सुलभ करण्यात आले आहे. प्रत्येक महसूल अधिकारी तंत्रज्ञानस्नेही व्हावा, या उद्देशाने जमाबंदी आयुक्तांनी ३३२ लॅपटॉप व ४६ प्रिंटर्स मंजूर केले असून, त्यापैकी ५३ लॅपटॉप मिरज व सांगली येथील तहसील कार्यालयांतील तलाठ्यांना वितरित करण्यात आले आहेत. पंचनामे, कर्जमाफी नोंदी यांसारख्या कामांमध्ये या साधनांचा मोठा उपयोग होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी सांगितले की, डिजिटायझेशन उपक्रम केवळ महसूल विभागापुरता मर्यादित नसून ग्रामविकास व महिला-बालविकास विभागातही तो राबविण्यात येत आहे. सध्या महसूल विभागाचे सुमारे ८० टक्के काम ऑनलाइन झाले असून, मार्च २०२७ पर्यंत उर्वरित कामही ऑनलाइन करण्याचे उद्दिष्ट आहे.
महानगरपालिका आयुक्त संजिता महापात्रा यांनी शासनाकडून मिळालेल्या साधनसामग्रीची जबाबदारीने काळजी घेण्याचे आवाहन केले. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे यांनी सविस्तर सादरीकरण केले. प्रास्ताविक तहसीलदार लिना खरात यांनी केले.
कार्यक्रमास महसूल विभागाचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, मंडल अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments: