न्याय, बंधुता व समता या त्रिसूत्रीवर काम करणार – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड कोल्हापूर, दि. २५ :
न्याय, बंधुता व समता या त्रिसूत्रीवर काम करणार – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड.
-----------------------कोल्हापूर, दि. २५ :
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेल्या न्याय, बंधुता व समता या त्रिसूत्रीवर जिल्ह्यातील प्रशासनाचे कामकाज राबविणार असल्याची ग्वाही नूतन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महाराणी ताराबाई सभागृहात नूतन जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत तसेच मावळते जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांच्या हस्ते डॉ. राठोड व श्री. येडगे यांना छत्रपती शाहू महाराजांचा पूर्णाकृती पुतळा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. धीरजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, महसूल उपजिल्हाधिकारी डॉ. संपत खिलारी, प्रांताधिकारी समीर शिंगटे, मोसमी बर्डे-चौगुले, प्रसाद चौगुले आदी अधिकारी उपस्थित होते.
डॉ. राठोड म्हणाले, “कोल्हापूर हे शहर नसून ती एक भावना आहे. माजी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. त्यांच्या कामाच्या पायावर पुढील विकासाचा कळस चढवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.”
मावळते जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, “कोल्हापूर हा माणुसकीचा जिवंत झरा आहे. येथील नागरिक नाविन्यतेला सदैव पाठिंबा देतात. माझ्या कार्यकाळात सर्किट बेंच कार्यान्वित करता आले, हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.”
निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी श्री. येडगे यांनी प्रशासनाला मानवी चेहरा दिल्याचे नमूद केले. यावेळी विविध अधिकाऱ्यांनीही येडगे यांच्या कार्याचा गौरव केला.
भावनिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात श्री. येडगे यांना आणखी काही काळ कार्य करण्याची संधी मिळावी, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त झाली.
नूतत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड – थोडक्यात परिचय
डॉ. विजय चंद्रकांत राठोड हे बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील ठाकरवाडी तांडा येथील रहिवासी असून ते २०१४ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी दर्यापूर (जि. अमरावती) येथे प्रांताधिकारी, गडचिरोली येथे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, मीरा-भाईंदर महापालिकेत आयुक्त, मुंबई येथे अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात सहमुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जालना येथे जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. शिस्तबद्ध व कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

No comments: