साताऱ्यात शाहुपुरी पोलिसांची धडक कारवाई; विनापरवाना पिस्टलसह तरुण अटकेत --
साताऱ्यात शाहुपुरी पोलिसांची धडक कारवाई; विनापरवाना पिस्टलसह तरुण अटकेत.
----------------------------
सातारा जिल्हा प्रतिनिधी -
अमर इंदलकर
-----------------------------
सातारा, दि. २५ एप्रिल : साताऱ्यातील शाहुपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोठी कारवाई करत विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतूस असा एकूण ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू असताना शाहुपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांना गोपनीय माहिती मिळाली. मोळाचा ओढा परिसरातील राजपुरोहित दुकानासमोर एक इसम पिस्टलसह उभा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे व त्यांच्या पथकाला कारवाईचे आदेश देण्यात आले.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत संशयितास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले.आरोपीचे नाव हर्षल सुनील भोसले वय वर्षे 20 राहणार आझादनगर शाहूपुरी आहे. झडतीदरम्यान आरोपीकडून एक देशी बनावटीची पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
या प्रकरणी संबंधित आरोपीविरुद्ध शाहुपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले व पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक कुमार ढेरे यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने सहभाग घेतला असून पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बागवान हे करत आहेत.

No comments: