कृतिशील शिक्षक सैय्यद सलमान यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’
कृतिशील शिक्षक सैय्यद सलमान यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’
पुसद (प्रतिनिधी) : गुलाम नबी आझाद उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्स, पुसद येथील कृतिशील शिक्षक सैय्यद सलमान यांना त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याबद्दल ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. विद्यालयाच्या प्रगतीसाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान देण्यात आला.
माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या “माझी शाळा, सुंदर शाळा” या अभियानात नोडल अधिकारी म्हणून त्यांनी दिलेल्या सक्रिय सहभाग व प्रभावी योगदानाचाही यावेळी गौरव करण्यात आला.
सैय्यद सलमान हे गेल्या १२ वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी मराठी, समाजशास्त्र व अर्थशास्त्र विषयांत एम.ए. पदवी प्राप्त केली आहे. सध्या ते संत साहित्य या विषयावर पीएच.डी.चे संशोधन करीत आहेत. शिक्षक म्हणून कार्य करत असतानाच संत साहित्याचे अभ्यासक म्हणूनही ते सामाजिक प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.
विद्यालयात त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रम, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, करिअर गाईडन्स कार्यशाळा तसेच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक मोहम्मद सादिक शेख यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
या प्रसंगी विद्यालयातील शिक्षकवृंद व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन्मानाबद्दल सैय्यद सलमान यांनी मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेचे आभार मानले. त्यांच्या या यशामुळे शिक्षकवर्गात आनंदाचे वातावरण असून इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळत आहे.

No comments: