Header Ads

कुपवाडमध्ये आयुक्त संजीता महापात्र यांची ‘स्पॉट व्हिजिट’; पायाभूत सुविधांना गती देण्याचे निर्देश

 कुपवाडमध्ये आयुक्त संजीता महापात्र यांची ‘स्पॉट व्हिजिट’; पायाभूत सुविधांना गती देण्याचे निर्देश.

------------------------------

मिरज : प्रतिनिधी राजू कदम.

-------------------------------

सांगली, मिरज व कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आयुक्त संजीता महापात्र यांनी कुपवाड येथील विभागीय क्षेत्रीय कार्यालय क्र. ३ अंतर्गत वॉर्ड क्रमांक २ व ८ मधील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून पायाभूत सुविधांच्या कामांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले.

“शहरातील सर्व विकासकामे विहित मुदतीत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करावीत,” असे स्पष्ट निर्देश देत प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्यावर त्यांनी भर दिला. यावेळी नालेसफाई व बांधकाम, रस्ते रुंदीकरण, उद्याने तसेच अभ्यासिकेच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

चैत्रबन नाला तसेच खारी मळा ते आनंदनगर नाला या कामांची पाहणी करत चैत्रबन नाल्याचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश संबंधित मक्तेदारास देण्यात आले. विकास कॉलनी व झेडपी कॉलनी परिसरातील अतिक्रमणांची पाहणी करून ती त्वरित हटविण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

लक्ष्मी मंदिर ते सूतगिरणी चौक रस्ता तसेच राजे मल्हारराव होळकर चौक रुंदीकरणाच्या कामांचा आढावा घेत, या कामांना गती देण्याचे निर्देश देण्यात आले. स्व. मदनभाऊ पाटील स्टेडियम व कुपवाड चिल्ड्रन पार्क येथील उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

याशिवाय आयुक्तांनी कुपवाड क्षेत्रीय कार्यालयातील विविध उपविभागांना भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. तसेच सांगली येथील वि. स. खांडेकर अभ्यासिकेस भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. येथे MPSC/UPSC अभ्यास केंद्र सुरू करण्याच्या सूचना देत, स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक नवीन पुस्तकांची खरेदी, इमारतीची दुरुस्ती तसेच आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश दिले.

या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता पृथ्वीराज पाटील, कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, सहाय्यक संचालक (नगररचना) हणमंत मारनूर, मुख्य स्वच्छता अधिकारी सचिन सागावकर, सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे, उपअभियंता महेश मदने, अमीरहमजा मुलानी, अभियंता ऋतुराज यादव, प्रणव खोत, स्वच्छता अधिकारी सिद्धांत ठोकळे तसेच स्थानिक नगरसेवक संतोष पाटील, विष्णू माने, दीपक वायदंडे, योगिता राठोड, मीनाक्षी पाटील व नागरिक उपस्थित होते

No comments:

Powered by Blogger.