Header Ads

आंबा वनपरिक्षेत्रात पर्यावरण दिन उत्साहात; धनेश संवर्धन व स्वच्छता मोहिमेवर भर.

 आंबा वनपरिक्षेत्रात पर्यावरण दिन उत्साहात; धनेश संवर्धन व स्वच्छता मोहिमेवर भर.

-----------------------------------
मलकापूर / आंबा: रोहित पास्ते.
-----------------------------------

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सह्याद्री व्याघ्र राखीव अंतर्गत आंबा वनपरिक्षेत्रामध्ये विविध पर्यावरण संवर्धनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ५ जून रोजी झालेल्या या कार्यक्रमात वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम आणि 'जंगलाचा शेतकरी' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धनेश (Hornbill) पक्ष्यांच्या संवर्धनासाठी विशेष वृक्षलागवड उपक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.

या मोहिमेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पातील चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये धनेश प्रजातींसाठी आवश्यक असणाऱ्या 'फूड व नेस्टिंग ट्री' म्हणजेच खाद्य आणि घरट्यांच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. धनेश पक्ष्यांच्या विष्ठेतून संकलित केलेल्या बियांपासून तयार करण्यात आलेल्या ३० हून अधिक प्रजातींची सुमारे ५०० रोपे येथील विविध संरक्षण कुट्यांजवळ लावण्यात आली. धनेश पक्षी विविध वनस्पतींच्या बियांचे प्रसारण करून जंगलाच्या नैसर्गिक पुनर्निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने, सह्याद्री संकल्प सोसायटीच्या माध्यमातून हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यामुळे धनेशाच्या चारही प्रजातींसह इतर फळाहारी पक्षी व वन्यप्राण्यांसाठी भविष्यात दर्जेदार अधिवास निर्माण होणार आहे.

याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आंबा सडा येथे विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी परिसरातील प्लास्टिक व इतर कचरा संकलित करून स्वच्छ व पर्यावरणपूरक वातावरण निर्माण करण्याचा संदेश दिला. हा कार्यक्रम सह्याद्री व्याघ्र राखीवचे क्षेत्र संचालक तुषार चव्हाण व चांदोलीच्या उपसंचालक श्रीमती स्नेहलता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.

याप्रसंगी चांदोलीच्या सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती अंकिता तरडे, आंबा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कोकितकर, वनपाल सुरेश चरापले, राहुल पाटील, सौ. मनीषा देसाई, वनरक्षक कु. कोमल मराठे, रोहिदास पडवळे, सुभाष वसावे, सह्याद्री संकल्प सोसायटीचे कार्यकारी संचालक प्रतीक मोरे, प्रकल्प व्यवस्थापक विराज आठल्ये, रिसर्च फेलो अतिश माइनकर यांच्यासह सर्व वनमजूर उपस्थित होते.

No comments:

Powered by Blogger.