Header Ads

आरंभ महिला ग्रामसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.

 आरंभ महिला ग्रामसंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न.

--------------------------
कैलास बोडके.
----------------------------

आळेफाटा (प्रतिनिधी )

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत पंचायत समिती जुन्नरच्या मार्गदर्शनाखाली  ओतूर(ता. जुन्नर )येथील आरंभ महिला ग्रामसंघ, ओतूर यांची सन २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार दि. २७ जून रोजी उत्साहपूर्ण व खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. 

   यावेळी जिल्हा परिषद सदस्या छाया तांबे, पंचायत समिती सदस्य प्रशांत डुंबरे, ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस रोहित बोंबले, शिवसृष्टी प्रभाग संघाचे समन्वयक रविंद्र आल्हाट, ग्रामसंघाच्या अध्यक्षा रंजना घोलप, सचिव विद्या गिते, कोषाध्यक्ष प्रमिला भोरे, लेखापाल वर्षा बर्डे, पल्लवी वाघ, उज्वला थोरात, सीआरपी काजल डुंबरे तसेच ग्रामसंघाच्या सर्व पदाधिकारी, महिला बचत गटांच्या सदस्या उपस्थित होत्या.

   सभेच्या अध्यक्षस्थानी शकुंतला डुंबरे या होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन आरंभ ग्रामसंघाच्या अध्यक्षा रंजना घोलप यांनी केले व अनुमोदन सोनाली तांबे यांनी दिले.

   यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या छाया तांबे म्हणाल्या की, “महिलांनी आर्थिक स्वावलंबनाबरोबरच सामाजिक विकासातही सक्रिय सहभाग घेऊन ग्रामसंघाच्या अधिक प्रभावी कार्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.”

   पंचायत समिती सदस्य प्रशांत डुंबरे म्हणाले की, “आजच्या काळात महिला केवळ कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या नसून समाज परिवर्तनाच्या प्रमुख घटक आहेत. बचत गटाच्या माध्यमातून तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहात, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. आर्थिक सक्षमीकरणासोबतच कायद्याची जाणीव आणि स्वतःच्या हक्कांबाबत जागरूक असणे तितकेच महत्त्वाचे आहे.”

   ओतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे म्हणाले की, “ सायबर गुन्हे, ऑनलाइन फसवणूक, डिजिटल व्यवहारांमधील सुरक्षितता, महिलांवरील अत्याचार आणि कौटुंबिक हिंसाचार याबाबत सतर्क राहा. कोणतीही संशयास्पद घटना घडल्यास ती लपवून न ठेवता त्वरित पोलीस प्रशासनाशी संपर्क साधा. योग्य वेळी तक्रार केल्यास अनेक गुन्हे रोखता येतात. प्रत्येक महिलेने स्वतःच्या सुरक्षिततेबरोबरच आपल्या कुटुंबातील मुला-मुलींना चांगले संस्कार, कायद्याचे पालन आणि सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करा.” 

   सभेत ग्रामसंघाच्या वार्षिक कामकाजाचा आढावा, आर्थिक अहवाल, बचत व कर्ज व्यवहार, विविध उपक्रमांचा आढावा तसेच आगामी वर्षासाठीचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महिला सदस्यांना सीआयएफ निधी १२ लाख ६० रुपयांचा धनादेश सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांच्या हस्ते देण्यात आला. 

   सभेमध्ये महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती शिवसृष्टी प्रभाग संघाचे समन्वयक रविंद आल्हाट यांनी दिली. महिला सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत विविध विषयांवर रेश्मा तांबे व दीपा तांबे यांनी मांडली. ग्रामसंघाच्या प्रगतीसाठी सातत्याने एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार यावेळी महिला सदस्यांनी व्यक्त केला.

  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रंजना घोलप यांनी केले तर आभार सोनाली तांबे यांनी मानले.

No comments:

Powered by Blogger.