माहितीवर मक्तेदारी नव्हे, समान संधी हवी; गांधीनगर पोलीस ठाण्याच्या माहिती वितरणाबाबत पत्रकार क्षेत्रातून आवाज.
माहितीवर मक्तेदारी नव्हे, समान संधी हवी; गांधीनगर पोलीस ठाण्याच्या माहिती वितरणाबाबत पत्रकार क्षेत्रातून आवाज.
--------------------------------कोल्हापूर : माहितीचा मुक्त प्रवाह, पारदर्शकता आणि सर्व माध्यमांना समान संधी ही लोकशाहीतील पत्रकारितेची मूलभूत तत्त्वे मानली जातात. मात्र गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे व इतर घटनांची माहिती सर्व कार्यरत पत्रकारांपर्यंत समान पद्धतीने पोहोचत नसल्याची भावना काही डिजिटल मीडिया, ई-पेपर आणि ऑनलाइन वृत्तसंस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.
पत्रकारांच्या म्हणण्यानुसार, गांधीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या अनेक महत्त्वाच्या घटना आणि गुन्ह्यांची माहिती काही निवडक माध्यमांपर्यंत तत्काळ पोहोचते. मात्र डिजिटल माध्यमांमध्ये कार्यरत असलेल्या अनेक पत्रकारांना बी-पार्ट, प्रेस नोट अथवा प्राथमिक माहिती वेळेवर मिळत नसल्याने वृत्तांकनात अडथळे निर्माण होत असल्याची चर्चा पत्रकार वर्तुळात सुरू आहे.
आजच्या डिजिटल युगात पत्रकारिता केवळ मुद्रित वर्तमानपत्रांपुरती मर्यादित राहिलेली नाही. ई-पेपर, न्यूज पोर्टल, वेब मीडिया आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत बातम्या पोहोचत आहेत. त्यामुळे माध्यमाचा प्रकार हा निकष न ठरता सर्व कार्यरत पत्रकारांना समान वागणूक मिळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
पत्रकारितेच्या क्षेत्रात कोणत्याही व्यक्ती, गट किंवा माध्यमाची मक्तेदारी असू शकत नाही. सार्वजनिक हिताची माहिती सर्व पात्र पत्रकारांपर्यंत समान पद्धतीने पोहोचणे हीच लोकशाहीची अपेक्षा आहे. त्यामुळे गांधीनगर पोलीस ठाण्याने सर्व कार्यरत पत्रकारांची अद्ययावत यादी तयार करून क्राईम माहिती गटात त्यांचा समावेश करावा आणि माहिती वितरणासाठी एकसमान व पारदर्शक प्रणाली राबवावी, अशी मागणी पुढे येत आहे.
माहितीवर नियंत्रण ठेवण्यापेक्षा माहितीचा समान आणि पारदर्शक प्रवाह राखणे हे प्रशासन आणि माध्यम या दोघांच्याही विश्वासार्हतेसाठी महत्त्वाचे आहे. बदलत्या काळानुसार डिजिटल माध्यमांचे योगदान स्वीकारून सर्व पत्रकारांना समान सन्मान आणि समान संधी मिळणे हीच खरी लोकशाही पत्रकारिता असल्याचे मत व्यक्त होत आहे.

No comments: