Header Ads

झोपेत असलेल्या पत्नीवर कोयत्याने सपासप वार; चरित्राच्या संशयातून पतीचा खुनाचा प्रयत्न, गगनबावड्यात खळबळ"

 "झोपेत असलेल्या पत्नीवर कोयत्याने सपासप वार; चरित्राच्या संशयातून पतीचा खुनाचा प्रयत्न, गगनबावड्यात खळबळ......


कोल्हापूर प्रतिनिधी:

कौटुंबिक वाद आणि चरित्राच्या संशयातून पतीने पत्नीवर कोयत्याने सपासप वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची थरारक घटना गगनबावडा तालुक्यातील लोंघे येथे सोमवारी पहाटे घडली. या हल्ल्यात पूजा विकास कुंभार (वय २७) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पती विकास मोहन कुंभार (वय ३२, रा. पोर्ले तर्फ ठाणे, ता. पन्हाळा) याच्याविरुद्ध गगनबावडा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमधील वारंवार होणाऱ्या वादामुळे पूजा कुंभार या मागील चार ते पाच दिवसांपासून माहेरी लोंघे येथे वास्तव्यास होत्या. सोमवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास विकास कुंभार हा सासरच्या घरी आला. त्यावेळी पूजा या घरात झोपलेल्या असताना त्याने घरात घुसून कोयत्याने त्यांच्यावर सपासप वार केल्याचे समोर आले आहे.

या भीषण हल्ल्यात पूजाच्या डोक्यावर, खांद्यावर, पाठीवर, बरगडीवर तसेच पायावर गंभीर जखमा झाल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूजाला नातेवाईक आणि ग्रामस्थांनी तातडीने मदत करून कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच गगनबावडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. संशयित विकास कुंभार याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे लोंघे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भारत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

No comments:

Powered by Blogger.