दुर्मिळ योग! पंचगंगेच्या पात्रातील प्राचीन महादेव मंदिर भाविकांसाठी खुले; 'सोमवती अमावस्ये'निमित्त करण्यात आली स्वच्छता.
दुर्मिळ योग! पंचगंगेच्या पात्रातील प्राचीन महादेव मंदिर भाविकांसाठी खुले; 'सोमवती अमावस्ये'निमित्त करण्यात आली स्वच्छता.
---------------------------------कोल्हापूर : कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीच्या पात्रात असलेले प्राचीन महादेव मंदिर नदीची पाणीपातळी कमी झाल्यामुळे पूर्णपणे खुले झाले आहे. सोमवती अमावस्येचे औचित्य साधून या ऐतिहासिक मंदिराची स्वच्छता करून पूजा करण्यात आली.
साचलेला गाळ काढून गाभारा चकाकला
नदीचे पाणी ओसरल्याने हे मंदिर आज पूर्णपणे दृश्यमान झाले. या संधीचा लाभ घेत 'राजाराम बंधारा ग्रुप'च्या वतीने सकाळी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदस्यांनी मंदिर परिसरात आणि गाभाऱ्यात साचलेला गाळ काढून परिसर स्वच्छ केला. त्यानंतर महादेवाच्या पवित्र पिंडीची विधीवत पूजा करण्यात आली.
भाविकांना दर्शनाची सुवर्णसंधी
मंदिर स्वच्छ झाल्यामुळे आता भाविकांना नदीपात्रात जाऊन महादेवाच्या पिंडीचे आणि या अद्भुत मंदिराचे दर्शन घेणे सहज शक्य झाले आहे. अनेक वर्षांनंतर असे दुर्मिळ दर्शन घडत असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.
सहभागी सदस्य
या स्वच्छता मोहिमेत दीपक बेडेकर, सिद्धार्थ रणदिवे, शिवाजी ठाणेकर, सर्जेराव मोरे, सूर्यकांत सुतार, जितू केंबळे यांसह राजाराम बंधारा ग्रुपचे इतर सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भाविकांना आवाहन
कसबा बावडा आणि परिसरातील सर्व शिवभक्तांनी या दुर्मिळ दर्शनाचा लाभ घ्यावा आणि भगवान महादेवाचे आशीर्वाद प्राप्त करावेत, असे आवाहन राजाराम बंधारा ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments: