अंबाजोगाई हादरली! भररस्त्यात 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; दगड, विटा आणि धारदार शस्त्रांनी अमानुष हल्ला.
अंबाजोगाई हादरली! भररस्त्यात 23 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; दगड, विटा आणि धारदार शस्त्रांनी अमानुष हल्ला.
अंबाजोगाई | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर येथे शनिवारी रात्री घडलेल्या निर्घृण हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरला आहे. अण्णाभाऊ साठे चौकात अज्ञात हल्लेखोरांनी 23 वर्षीय तरुणावर धारदार शस्त्रे, दगड आणि विटांनी जीवघेणा हल्ला करत त्याची भररस्त्यात हत्या केली. या हल्ल्यात त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मृत तरुणाची ओळख ज्ञानेश्वर वाकडे (वय 23, रा. पट्टीवडगाव) अशी झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ज्ञानेश्वर आपल्या मित्रासह दुचाकीवरून घरी परतत असताना घाटनांदूर येथील अण्णाभाऊ साठे चौकात काही जणांनी त्यांची दुचाकी अडवली. त्यानंतर दोघांवर अचानक प्राणघातक हल्ला करण्यात आला.
हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांसह दगड आणि विटांचा वापर करून अमानुष मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण हल्ल्यात ज्ञानेश्वरचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अंबाजोगाई ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास करत असून, आरोपींचा शोध सुरू आहे. मयताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
या थरारक घटनेमुळे घाटनांदूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कायदा व सुव्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांकडून तपास पूर्ण झाल्यानंतर हल्ल्यामागील कारण आणि आरोपींबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची अपेक्षा आहे.

No comments: