Header Ads

सराईत गुन्हेगाराकडून ५७६ ग्रॅम गांजा जप्त; मिरजमध्ये विक्रीसाठी आणलेला साठा पोलिसांच्या जाळ्यात.

 सराईत गुन्हेगाराकडून ५७६ ग्रॅम गांजा जप्त; मिरजमध्ये विक्रीसाठी आणलेला साठा पोलिसांच्या जाळ्यात.

-----------------------------------------------

 सागली मिरज प्रतिनिधी.

राजू कदम 

---------------------------------------------


मिरज शहरात गांजाची किरकोळ स्वरूपात विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगाराला महात्मा गांधी चौक पोलिसांनी सापळा रचून अटक केली. या कारवाईत ५७६ ग्रॅम वजनाचा गांजा, मोटारसायकलसह एकूण ४३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या खात्रीलायक गोपनीय माहितीनुसार, सराईत गुन्हेगार खालीद रियाज मोमीन (वय ३५, रा. अमर टॉकीजसमोर, ख्वाजा झोपडपट्टी, मिरज) हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या मागील अंधाऱ्या बोळात गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे व डी.बी. पथकाने पंच व छायाचित्रकाराच्या उपस्थितीत सापळा रचला.

संशयित मोटारसायकलवर प्लास्टिकची पिशवी घेऊन थांबलेला असताना पोलिसांनी त्याला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून १०३ प्लास्टिकच्या छोट्या पुड्यांमध्ये भरलेला ५७६ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. चौकशीत हा गांजा मिरज परिसरात चढ्या दराने किरकोळ विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले.

याप्रकरणी संशयिताविरुद्ध एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विश्वजीत गाडवे करीत आहेत.

महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाने यापूर्वीही गांजा, नशेची इंजेक्शने, नशेच्या गोळ्या, प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व गुटखा याविरोधात अनेक प्रभावी कारवाया केल्या आहेत. "नशामुक्त भारत अभियान" अंतर्गत अंमली पदार्थांची विक्री व वितरण रोखण्यासाठी अशाच प्रभावी कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले असून, नागरिकांनी अंमली पदार्थांच्या विक्रीबाबत माहिती मिळाल्यास तातडीने पोलीस प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments:

Powered by Blogger.