राधानगरी धरण ६०% भरले! पावसाचा जोर ओसरला, तरी जलसाठ्यात समाधानकारक वाढ.
राधानगरी धरण ६०% भरले! पावसाचा जोर ओसरला, तरी जलसाठ्यात समाधानकारक वाढ.दोन दिवसांत पाऊस कमी, पण धरणात पाण्याची आवक कायम; अद्याप कोणताही इशारा नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~राधानगरी धरण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी धरणातील पाणीसाठ्यात समाधानकारक वाढ होत आहे. पाटबंधारे विभागाच्या ताज्या माहितीनुसार, राधानगरी धरण सध्या ६० टक्के भरले असून धरणात पाण्याची आवक अद्यापही सुरू आहे.
आज सकाळी ७ ते सायंकाळी ४ या कालावधीत धरण परिसरात ९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सध्या धरणाची पाणीपातळी ३२६.४५ मीटर असून धरणात ४९.६६९१ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा उपलब्ध आहे.
यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून आजपर्यंत १,४९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून त्यामुळे धरणातील जलसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे. धरण परिसरातील नाले आणि ओढ्यांमधील प्रवाह वाढल्याने भोगावती नदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
पावसाचा जोर काहीसा ओसरला असला, तरी धरण क्षेत्रात पाण्याची आवक कायम असल्याने पाटबंधारे विभाग परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. सध्या कोणताही सावधगिरीचा इशारा देण्यात आलेला नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments: