घरचाच निघाला चोर! मित्राच्या मदतीने दागिने लंपास; ७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त
घरचाच निघाला चोर! मित्राच्या मदतीने दागिने लंपास; ७.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील बिसूर गावात अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतःच्याच घरात मित्राच्या मदतीने घरफोडी करून सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दोन आरोपींना सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) अटक केली आहे. आरोपींकडून सोन्याचे दागिने आणि मोबाईल फोनसह ७ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
११ जुलै २०२६ रोजी फिर्यादी दिपश्री बाळासो पाटील या कामानिमित्त बाहेर गेल्या असताना घराचा दरवाजा उघडून बेडमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीला गेले होते. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी विशेष पथक तयार करून तपास सुरू केला. १४ जुलै रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अक्षरम हॉटेल परिसरात सापळा रचण्यात आला. तेथे संशयित दिपेश बाळासो पाटील (वय २५) आणि महेशकुमार खंडेराव पाटील (वय ३९, दोघेही रा. बिसूर, ता. मिरज) यांना ताब्यात घेण्यात आले.
झडतीदरम्यान दिपेश पाटील याच्याकडून सोन्याची चैन आणि अंगठ्या आढळून आल्या. चौकशीत त्याने स्वतःच्या घरातील सर्वजण बाहेर गेल्याची संधी साधून मित्र महेशकुमार पाटीलच्या मदतीने घरफोडी करून दागिने चोरल्याची कबुली दिली.
आरोपींकडून ३४ ग्रॅम वजनाचे ५.८५ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, १.३४ लाख रुपयांचा आयफोन १७ प्रो आणि २० हजार रुपयांचा सॅमसंग मोबाईल असा एकूण ७ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
दोन्ही आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत. आरोपींसह जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

No comments: