अमरावती रेल्वे स्टेशनवर सुरक्षेचा भंग! थेट प्लॅटफॉर्मवर धावली 'व्हीआयपी' कार; प्रवाशांमध्ये संताप
अमरावती रेल्वे स्टेशनवर सुरक्षेचा भंग! थेट प्लॅटफॉर्मवर धावली 'व्हीआयपी' कार; प्रवाशांमध्ये संताप.
पी. एन. देशमुख | जिल्हा प्रतिनिधी, अमरावती
अमरावती रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सायंकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने रेल्वे सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अमरावती–मुंबई–अहमदनगर एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर उभी असतानाच एक खाजगी कार थेट प्लॅटफॉर्मवर आणि रेल्वे डब्यांच्या अगदी जवळपर्यंत पोहोचल्याचे समोर आले. हा प्रकार पाहून प्रवाशांमध्ये
संतापाची लाट उसळली.
घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि शासकीय रेल्वे पोलीस (GRP) यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर जोरदार टीका सुरू झाली आहे. मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा तपासणी, बॅरिकेड्स आणि निगराणी व्यवस्था असूनही वाहन आत कसे शिरले, याबाबत नागरिकांनी चौकशीची मागणी केली आहे.
प्रवाशांच्या मते, गर्दीच्या रेल्वे स्थानकावर कोणतेही खासगी वाहन थेट ट्रेनजवळ पोहोचणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या वाहनाला विशेष परवानगी देण्यात आली होती का, की नियमांचे उल्लंघन झाले, याबाबतही चर्चा रंगली आहे.
दरम्यान, आरपीएफ निरीक्षक प्रमोद शेगावकर यांनी माहिती देताना सांगितले की, संबंधित वाहनचालकाविरुद्ध भारतीय रेल्वे कायद्यातील कलम १४७ व १५९ अन्वये कारवाई करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्रचा सवाल
रेल्वे स्थानकावरील सुरक्षा व्यवस्था इतकी ढिसाळ झाली आहे का की खासगी वाहन थेट प्लॅटफॉर्मवर पोहोचते? या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे आता अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

No comments: