Header Ads

म्हैसाळमध्ये सुगंधी तंबाखू-गुटख्याची अवैध विक्री; तिघे जेरबंद

 म्हैसाळमध्ये सुगंधी तंबाखू-गुटख्याची अवैध विक्री; तिघे जेरबंद मिरज ग्रामीण पोलिसांची कारवाई; २० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.


मिरज | प्रतिनिधी : राजू कदम

शासनाने निर्बंध घातलेल्या सुगंधी तंबाखू व गुटख्याची अवैध विक्री करणाऱ्या तिघांवर मिरज ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. म्हैसाळ येथील एस.टी. स्टँडजवळ १८ सप्टेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली असून, पोलिसांनी २० हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळालेल्या माहितीनुसार, एस.टी. स्टँडजवळ तपासणी करताना संशयितांकडून प्रतिबंधित सुगंधी तंबाखू व गुटखा आढळून आला. याप्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी अनिल अरुणराव पवार यांच्या फिर्यादीवरून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणात तानाजी अन्नासो दबडे (वय ३६, रा. कागवाड, जि. बेळगाव), अविनाश अशोक शिंदे (वय ४८, रा. म्हैसाळ) आणि विशाल शशिकांत पिंपळे (वय ४४, रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) यांना अटक करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, सहायक पोलीस निरीक्षक विक्रांत संकपाळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रविण यादव तसेच मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने केली.

No comments:

Powered by Blogger.