महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावणारी रेकॉर्डवरील टोळी जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त.
महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन हिसकावणारी रेकॉर्डवरील टोळी जेरबंद; ११ लाखांचा मुद्देमाल जप्त
----------------------सांगली जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) चेन स्नॅचिंग करणाऱ्या रेकॉर्डवरील दोन आरोपींना अटक करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून शिराळा आणि कोकरूड पोलीस ठाण्यातील दोन चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
शिराळा पोलीस ठाण्यात २७ जून २०२६ रोजी मनिषा सुनील पाटील (रा. टोप, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा माग काढला.
८ जुलै २०२६ रोजी पोलिसांनी लक्ष्मण चंद्रकांत चाळके (वय ३४, रा. चांदोली वसाहत, आष्टा, ता. वाळवा, जि. सांगली) आणि अमित नानासो बुधावले (वय २७, रा. शाहापूर, इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर, मूळ गाव विसापूर, ता. खटाव, जि. सातारा) यांना अटक केली.
चौकशीत आरोपींनी शिराळा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. १२२/२०२६ तसेच कोकरूड पोलीस ठाण्यातील गुन्हा क्र. ३५/२०२६ केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सुमारे ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार, पोलीस उपनिरीक्षक महादेव पोवार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, शिराळा पोलीस ठाणे आणि सायबर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.
पोलिसांकडून आरोपींची अधिक चौकशी सुरू असून, त्यांच्या विरोधात आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

No comments: