डफरीन रुग्णालयात मृत्यूतांडव; तीन नवजातांचा बळी, आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर!
डफरीन रुग्णालयात मृत्यूतांडव; तीन नवजातांचा बळी, आरोग्य यंत्रणेचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरीन) येथील विशेष नवजात शिशु काळजी कक्ष (SNCU) मध्ये २४ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास व्हेंटिलेटरमध्ये झालेल्या स्फोटानंतर भीषण आग लागून तीन निष्पाप नवजात बालकांचा मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, डफरीन रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा ढिसाळ कारभार उघड झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, व्हेंटिलेटरमध्ये तांत्रिक बिघाड होऊन आग लागली. धूर पसरल्याने आणि आगीच्या झळांमुळे तीन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रुग्णालयातील यंत्रसामग्रीची नियमित तपासणी आणि देखभाल झाली होती का, असा गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहे.
दरमहा SNCU विभागाचा अहवाल अकोला विभागीय उपसंचालक कार्यालयाकडे पाठविला जात असल्याचे सांगितले जाते. मग या अहवालांवर कोणती कारवाई झाली? एवढ्या मोठ्या जिल्हा स्त्री रुग्णालयात अद्ययावत आणि सुरक्षित आयसीयू व्यवस्था का नव्हती? अशा प्रश्नांनी नागरिक आणि पालक संतप्त झाले आहेत.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी संजय काटकर यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. मात्र दुर्घटनेनंतर अनेक दिवस उलटूनही चौकशीचा निष्कर्ष समोर न आल्याने, दोषींना वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा सवाल मृत बालकांच्या पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
जनतेची मागणी
दुर्घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी.
जबाबदार अधिकारी व संबंधितांवर कठोर कारवाई.
राज्यातील सर्व SNCU विभागांचे तातडीने सुरक्षा ऑडिट.
मृत बालकांच्या कुटुंबियांना न्याय आणि योग्य मदत.
ही घटना केवळ अपघात नसून आरोग्य यंत्रणेतील गंभीर निष्काळजीपणाचे भयावह उदाहरण असल्याची भावना अमरावतीसह राज्यभरातून व्यक्त होत आहे.

No comments: