सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे निलंबित.
सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे निलंबित.
सातारा | प्रतिनिधी – अमर इंदलकर
सातारा जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे यांना महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने १५ सप्टेंबर २०२६ पासून निलंबित केले आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४(१)(अ) अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.
शासनाच्या आदेशानुसार, फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेशी संबंधित कामकाजात विलंब, तांत्रिक यंत्रणेवर पुरेसे नियंत्रण न ठेवणे, वरिष्ठांच्या आदेशांचे पालन न करणे आणि प्राप्त तक्रारी विहित मुदतीत निकाली न काढणे यांसह विविध बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.
तसेच फलटण तालुक्यातील विडणी प्रकरण, प्रशासकीय कामकाजातील दिरंगाई आणि विविध प्रकरणे प्रलंबित ठेवण्याबाबतही शासन आदेशात नोंद असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी चोपडे यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची प्रक्रिया सुरू होती. शिक्षण आयुक्तालयाने २८ ऑगस्ट २०२६ रोजी निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला होता.
शासनाच्या आदेशानुसार, निलंबन काळात त्यांचे मुख्यालय माध्यमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा सातारा कार्यालय राहणार असून पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. विभागीय चौकशीची पुढील प्रक्रिया सुरू राहणार आहे.

No comments: