Header Ads

सांगलीत API संदीप कांबळेंच्या समर्थनार्थ संघटना आक्रमक! ‘आरोपांची निष्पक्ष चौकशी करा, खोटी तक्रार करणाऱ्यांवर कारवाई करा’

 सांगलीत API संदीप कांबळेंच्या समर्थनार्थ संघटना आक्रमक! ‘आरोपांची निष्पक्ष चौकशी करा, खोटी तक्रार करणाऱ्यांवर कारवाई करा’


सांगली | प्रतिनिधी.राजु कदम 

सांगली शहर पोलीस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप एकनाथ कांबळे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याचा दावा करत आंबेडकरवादी सामाजिक संघटना व दहाड संघटनेच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणाची सखोल व निष्पक्ष चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी तसेच खोटी तक्रार करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्टेशन चौक परिसरात उभारण्यात आलेल्या पाळण्यांच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी एपीआय संदीप कांबळे व पोलीस कर्मचारी बंदोबस्तावर तैनात होते. यावेळी नागरिक व संबंधितांना कायदा-सुव्यवस्थेबाबत सूचना देण्यात येत असताना तक्रारदारांनी पोलिसांशी वाद घातल्याचा दावा संघटनांच्या निवेदनातून करण्यात आला आहे.

तक्रारदारांकडून पोलिसांशी वादावादी तसेच उद्धट व दमदाटीच्या भाषेत बोलण्यात आल्याचा आरोपही संघटनांनी केला आहे. घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी तपासण्याआधी एकतर्फी कारवाई करू नये, अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी मांडली.

या प्रकरणात तक्रारदारांना राजकीय पाठबळ असल्याचा दावा करत, राजकीय दबावातून एपीआय संदीप कांबळे यांच्यावर कोणतीही कारवाई होऊ नये, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली. घटनेशी संबंधित उपलब्ध पुरावे, साक्षीदार आणि इतर बाबींची पडताळणी करून निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संघटनांनी केली.

याबाबत सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सचिन कांबळे, उमेश होंडे, विश्वास खांडेकर, तुषार खांडेकर, रोहित शिवशरण, सुजित लोखंडे, परशुराम बनसोडे, सागर आवळे, धिरज गोरे, आकाश कांबळे, कपिल कबाडगे, हणमंत कांबळे, नितीन कांबळे आणि वैभव खांडेकर यांच्यासह आंबेडकरवादी सामाजिक संघटना व दहाड संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आता या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीतून नेमकी वस्तुस्थिती काय समोर येते, याकडे सांगलीकरांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Powered by Blogger.