आरगमध्ये नियम मोडणाऱ्या ९ गणेश मंडळांवर पोलिसांचा धडक दणका; ध्वनी प्रदूषणप्रकरणी अध्यक्ष आणि डीजे मालकांवर कारवाई.
आरगमध्ये नियम मोडणाऱ्या ९ गणेश मंडळांवर पोलिसांचा धडक दणका; ध्वनी प्रदूषणप्रकरणी अध्यक्ष आणि डीजे मालकांवर कारवाई.
मिरज-कुपवाड | प्रतिनिधी : राजू कदम.
----------------------------------------------
गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचा भंग मिरज ग्रामीण पोलिसांनी गंभीरपणे घेत आरग (ता. मिरज) येथील ९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर धडक कारवाई केली. नियमापेक्षा अधिक क्षमतेचे डीजे लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केल्याप्रकरणी मंडळांचे अध्यक्ष आणि संबंधित साउंड सिस्टिम मालकांविरोधात कारवाई करण्यात आली.
पोलीस अधीक्षक तुषार दोषी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी गणेशोत्सवापूर्वीच सर्व मंडळांना ध्वनी प्रदूषणाचे नियम काटेकोरपणे पाळण्याचे आवाहन केले होते. डीजे वापरताना एक बेस आणि एक टॉप या मर्यादेचे पालन करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते.
मात्र, १७ सप्टेंबर रोजी आरग येथील विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांनी ४ बेस व २ टॉप अशा उच्च क्षमतेच्या डीजे सिस्टिमचा वापर केला. पोलिसांनी घटनास्थळी डेसीबल मीटरद्वारे आवाजाची अधिकृत मोजणी केली असता ध्वनीची तीव्रता कायदेशीर मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले.
या प्रकरणी बिरदेव तरुण मंडळ, सत्यप्रेमी गणेशोत्सव मंडळ, हिंदवी गणेशोत्सव मंडळ, श्री गणेश मंडळ, नवज्योत गणेशोत्सव मंडळ, वीर गर्जना गणेशोत्सव मंडळ, नवरत्न गणेशोत्सव मंडळ तसेच इतर संबंधित मंडळांचे अध्यक्ष आणि साउंड सिस्टिम मालकांविरोधात कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, गणेशोत्सवात ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्या कोणत्याही मंडळाची गय केली जाणार नाही. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात पुढेही अशाच कठोर कारवाया सुरू राहतील.

No comments: