Header Ads

मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या कमानीचा बीम कोसळला; ९ कामगार गंभीर जखमी! कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाचा आरोप; महात्मा गांधी चौक पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

 मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या कमानीचा बीम कोसळला; ९ कामगार गंभीर जखमी!

कंत्राटदाराच्या निष्काळजीपणाचा आरोप; महात्मा गांधी चौक पोलिसांत अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल.

मिरज | प्रतिनिधी : राजू कदम

मिरज येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात सुरू असलेल्या कमानीच्या बांधकामाचा वरील बीम अचानक कोसळून ९ कामगार गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना २१ सप्टेंबर रोजी दुपारी घडली. या दुर्घटनेप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी कंत्राटदारासह अपघातास जबाबदार असलेल्या अज्ञात व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 125, 125(अ) आणि 125(ब) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, २१ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजता सिव्हिल हॉस्पिटल, मिरज येथील आवारात कमानीचे बांधकाम सुरू होते. या बांधकामात कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी न घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

बांधकामासाठी कमकुवत लाकडी बाबू, लाकडी फळ्या, पोकळ बांबू आदी साहित्याचा वापर करण्यात आल्याने बांधकामाची सुरक्षितता धोक्यात आली, असा दावा पोलिसांत दाखल तक्रारीत करण्यात आला आहे. याचदरम्यान कमानीचा वरील बीम कोसळल्याने कामगार त्याखाली सापडून गंभीर जखमी झाले.

या दुर्घटनेत मिनरुल शेख, सियाराम चौधरी, कादर शेख, अरविंद कुमार चौधरी, आमीनसुर मलीक, राखीरमुल शेख, साहेब शेख, हसमतअली शेख आणि गाबबहार शेख हे नऊ कामगार जखमी झाले आहेत.

या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल तेजस ज्ञानदेव डांगे यांनी तक्रार दिली. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात CCTNS गुन्हा क्रमांक 300/2026 नोंद करण्यात आला आहे.

कंत्राटदाराच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

कामगारांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती का? बांधकामासाठी वापरण्यात आलेले साहित्य सुरक्षित होते का? तसेच दुर्घटनेस नेमके कोण जबाबदार आहे, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि शिंदे करीत असून, घटनेतील जबाबदारी निश्चित झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे. हॉस्पिटलसारख्या संवेदनशील ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाच्या सुरक्षिततेचा मुद्दा या दुर्घटनेमुळे ऐरणीवर आला आहे.

No comments:

Powered by Blogger.