Header Ads

सोन्याची शिरोलीत डेंग्यूच्या संशयित रुग्णांमुळे खळबळ; चार जण उपचारासाठी रुग्णालयात दाखल

 सोन्याची शिरोलीत डेंग्यूच्या संशयित रुग्णांमुळे खळबळ; चार जण उपचारासाठी रुग्णालयात दाखल आरोग्य यंत्रणेकडून घराघरांत पाण्याची तपासणी; नागरिकांमध्ये सतर्कतेचे आव्हान.

राधानगरी प्रतिनिधी : विजय बकरे.

----------------------------------------

राधानगरी तालुक्यातील सोन्याची शिरोली येथे डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचा संशय असलेले चार रुग्ण आढळल्याने गावात खळबळ उडाली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, आरोग्य विभागाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहेत.

मंगळवारी, २९ सप्टेंबर रोजी नितीन चौगुले (४०), छाया रमेश टिपुगडे (४०) आणि संजय मोहिते (५०) या तिघांना डेंग्यूसदृश लक्षणे आढळून आल्याने सोन्याची शिरोली येथील शासकीय दवाखान्यात प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ग्रामीण रुग्णालय, राधानगरी येथे दाखल करण्यात आले.

दरम्यान, ऋतुजा चौगुले (२५) यांनाही डेंग्यूसदृश लक्षणे आढळून आल्याने प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घराघरांत पाण्याची तपासणी

गावात डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांकडून घराघरांत जाऊन पाण्याची पाहणी व तपासणी करण्यात येत असल्याचे समजते. डासांची उत्पत्ती होणारी ठिकाणे शोधून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची कार्यवाही सुरू आहे.

आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

सोन्याची शिरोलीमध्ये आणखी रुग्ण वाढण्याची शक्यता लक्षात घेता, आरोग्य विभाग व स्थानिक प्रशासनाने अधिक प्रभावीपणे प्रतिबंधात्मक मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. गावातील साचलेले पाणी, पाण्याच्या टाक्या, भांडी व इतर संभाव्य डास उत्पत्तीची ठिकाणे तपासून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी नागरिकांनीही घराभोवती पाणी साचू न देणे, पाण्याची भांडी झाकून ठेवणे आणि तापासह डेंग्यूसदृश लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.

No comments:

Powered by Blogger.