कोल्हापुरात २.५२ कोटींची बेकायदेशीर सावकारी आणि खंडणी; करवीर पोलीस ठाण्यात ८ जणांवर गुन्हा दाखल.
कोल्हापुरात २.५२ कोटींची बेकायदेशीर सावकारी आणि खंडणी; करवीर पोलीस ठाण्यात ८ जणांवर गुन्हा दाखल.
-------------------------------
कोल्हापूर प्रतिनिधी
रहिम पिंजारी
-------------------------------
कोल्हापूर:गुंडांची भीती दाखवून, जिवे मारण्याची धमकी देऊन आणि बेकायदेशीर सावकारीच्या व्याजाच्या नावाखाली तब्बल २ कोटी ५२ लाख ५४ हजार ९२२ रुपयांची फसवणूक व खंडणी वसूल केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूरमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात एकूण ८ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सौ. गीता स्वप्नील मोरे (वय ३२, रा. फुलेवाडी रिंगरोड, कोल्हापूर) यांनी या संदर्भात करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ च्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.
यांच्यावर झाला गुन्हा दाखल:
१) *सिद्धेश मिलिंद गायकवाड (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर*)
२) *अजिंक्य संभाजी जाधव*
३) *स्वप्नील जाधव (उर्फ लाला शेठ*)
४) *सरिता मिलिंद गायकवाड (रा. शिवाजी पेठ, कोल्हापूर*)
५) *तेजस चंद्रकांत माने*
६) *स्वाती सुनील सिंगुर*
७) *गायत्री अजिंक्य साळोखे (रा. शिवाजीपेठ, कोल्हापूर*)
८) *अजिंक्य अशोक साळोखे (रा. शिवाजीपेठ, कोल्हापूर*)
काय आहे नेमकी घटना?
पोलीस माहितीनुसार, हा प्रकार २० सप्टेंबर २०२१ ते २ सप्टेंबर २०२६ या कालावधीत घडला. फिर्यादी गीता मोरे यांनी घरगुती अडचणी आणि बॅटरी व्यवसायासाठी संशयित मुख्य *आरोपी सिद्धेश गायकवाड* याच्याकडून वेळोवेळी १०% व्याजाने रक्कम घेतली होती. त्यानंतर आरोपीने व्यवसायासाठी आणखी ६ लाख रुपये १०% व्याजाने दिले.
व्याजाचे पैसे परत करण्यास उशीर झाल्यावर आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या पतीला पैशांची दुप्पट आणि त्रिपट अशी मागणी करून धमकावण्यास सुरुवात केली. तसेच, फिर्यादीच्या बँक खात्यावर पैसे पाठवून त्यावर सक्तीने १००% व्याज लावले.
दागिने आणि एटीएम कार्ड बळकावले
धमक्यांना घाबरून फिर्यादीने वेळोवेळी सोने तारण ठेवून आणि ओळखीच्या सोनारांकडून पैसे घेऊन आरोपींना दिले. मात्र, आरोपींनी संगनमत करून सावकारी करत फिर्यादीकडून नोटरी करून घेतली आणि त्यांचे सर्व सोन्याचे दागिने, चेकबुक आणि एटीएम कार्ड (ATM Card) जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादीच्या संमतीशिवाय त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढून घेण्यात आले आणि त्यांना सतत जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.
आरोपींनी एकूण २,५२,५४,९२२ रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि बँक खात्यातील पैसे बेकायदेशीरपणे लुबाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मोठ्या आर्थिक फसवणुकीमुळे अखेर पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. करवीर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

No comments: