डीजेला फाटा, ढोल-ताशांच्या गजरात कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून श्री गणरायाला भक्तिमय निरोप!
डीजेला फाटा, ढोल-ताशांच्या गजरात कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून श्री गणरायाला भक्तिमय निरोप!
कुपवाड | प्रतिनिधी राजू कदम
कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या श्री गणरायाला पारंपरिक, शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला. “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया” च्या जयघोषाने परिसर दुमदुमला आणि ढोल-ताशे, हालगी, लेझीम तसेच टाळ-मृदंगाच्या गजरात विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली.
विसर्जन मिरवणुकीत पोलीस अधिकारी, कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी, पत्रकार संघटनांचे पदाधिकारी आणि कुपवाड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पारंपरिक वेशभूषेतील महिला व मुलींनी सादर केलेल्या लेझीमने मिरवणुकीत विशेष आकर्षण निर्माण केले.
यावेळी डीजेचा वापर पूर्णपणे टाळून पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देण्यात आले. पर्यावरणपूरक, साध्या आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या विसर्जन सोहळ्याचे नागरिकांकडून विशेष कौतुक करण्यात आले.
कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आनंदराव घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हा विसर्जन सोहळा शांततेत, भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

No comments: