थुगाव, पिंपरी सह परिसरातील शेतकरी महावितरणच्या कारभारावर त्रस्त.
थुगाव, पिंपरी सह परिसरातील शेतकरी महावितरणच्या कारभारावर त्रस्त,१२तासांऐवजी केवळ ६ तास वीज पुरवठा.!
चांदुर बाजार---राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा अखंडीत १२ तास वीज देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बळीराजाने सुटकेचा श्वास सोडला असून, परिसरातील अनेक भागांत याची प्रभावी अंमलबजावणीही होत आहे. मात्र, या सर्व्हसमावेशक आदेशाला कुरळ येथील उपकेंद्राच्या हद्दीत हरताळ फासला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. कुरड उपकेंद्रावर अतिरिक्त ताण असल्याकारण सांगत महावितरणने थुगाव आणि पिंपरी या दोन्ही फिडरवरील वीज पुरवठा १२ तासांऐवजी केवळ ६ तास करण्याचा मनमानी निर्णय घेतला आहे. परिणामी, शासनाच्या निर्णयाची या भागात अक्षरशः पायमल्ली होत असून, शेतकरी वर्गात तीव्र संताप उसळला आहे.
तांत्रिक बिघाड आणि भारनियमनाचा दुहेरी त्रास
सध्या परिसरातील शेतशिवारात पिकांना पाण्याची अत्यंत निकडीची गरज आहे. मात्र, आधीच ६ तास मिळणाऱ्या या तुटपुंज्या वेळेतही महावितरणचा लहरी कारभार नशीबी आला आहे. ओव्हरलोडमुळे वारंवार ट्रिपिंग होणे, रोहित्र (DP) जळणे, तारा तुटणे आणि सततचे फॉल्ट यामुळे प्रत्यक्षात केवळ ३ ते ४ तासपर्येतच वीज फिडरवर टिकत आहे. या अनियोजित आणि अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचन चक्र पूर्णपणे कोलमडले आहे.
खर्च पाण्यात जाण्याची भीती, शेतकरी चिंतेत
सध्याच्या मोसमात पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही तर उत्पादनात मोठी घट होईल, तसेच बियाणे, खते, मशागत आणि सिंचनासाठी केलेला हजारो रुपयांचा लाखमोलाचा खर्च डोळ्यांसमोर मातीमोल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. "या संकटकाळात पिके वाचवायची कशी आणि कुटुंबाचा गाडा कसा हाकणार?" असा हवालदिल सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. या सर्व अतोनात नुकसानीला नेमके जबाबदार कोण? असा संतप्त प्रश्न आता विचारला जात आहे.
नवीन उपकेंद्राची व नवीन कृषिजोडण्यांची तातडीची मागणी
या गंभीर समस्येवर तात्काळ तोडगा काढण्यासाठी या भागात एक नवीन स्वतंत्र उपकेंद्र उभारणे ही आता काळाची गरज बनली आहे. जुन्या उपकेंद्रावरचा भार कमी करण्यासाठी नवीन उपकेंद्राची उभारणी करावी, तसेच अनेक ठिकाणी ओव्हरलोड झालेले डीपी बदलून नवीन बसवावेत, अशी मागणी होत आहे. विशेष म्हणजे, या भागातील वाढता ताण सांगून महावितरणने नवीन वीज जोडण्या देण्याचे काम बंद केले आहे, ज्यामुळे शेतकरी व नवोदित सिंचनधारक अडचणीत आले आहेत.
जनप्रतिनिधींनी लक्ष घालण्याची विनंती
या गंभीर समस्येची दखल परिसरातील लोकप्रतिनिधी आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घ्यावी, अन्यथा या भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान टळणार नाही. प्रशासनाने तात्काळ पावले उचलून थूगाव आणि पिंपरी फिडरला दिवसा पूर्ण १२ तास सुरळीत वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी आग्रही मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे. कारवाई न झाल्यास शेतकरी आंदोलनात्मक पावले उचलण्याच्या तयारीत आहेत शेतकरी योगानंद खापरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला:

No comments: