Header Ads

आकाशपाळणा परवान्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळ्यात.

 आकाशपाळणा परवान्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील हवालदार एसीबीच्या जाळ्यात.

------------------------------

सातारा प्रतिनिधी

अमर इंदलकर 

-------------------------------

तडजोडीनंतर ११ हजारांची लाच स्वीकारताना दीपक पोळ रंगेहाथ पकडले; पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्यावरही गुन्हा दाखल

सातारा प्रतिनिधी : आकाशपाळणा उभारण्यासाठी ना-हरकत परवानगी देण्याच्या बदल्यात लाचेची मागणी केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार दीपक लक्ष्मण पोळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संग्राम आत्माराम शेवाळे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसीबीकडून मिळालेल्या माहितीनुसार, सातारा शहरातील राजवाडा परिसरातील आळूचा खड्डा येथे आकाशपाळणा उभारण्यासाठी एका ३८ वर्षीय व्यावसायिकाने १३ सप्टेंबर रोजी शाहूपुरी पोलीस ठाण्यात ना-हरकत परवानगीसाठी अर्ज केला होता. परवानगीच्या पाठपुराव्यासाठी तक्रारदाराने गोपनीय विभागात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदार दीपक पोळ यांची भेट घेतली.

यावेळी पोळ यांनी पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्यासाठी ३० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने त्यापैकी १५ हजार रुपये दिले असून उर्वरित रक्कम दोन दिवसांत देण्याचे सांगितले होते. मात्र, उर्वरित १५ हजार रुपयांसाठी तगादा लावण्यात आल्याने तक्रारदाराने २३ सप्टेंबर रोजी सातारा एसीबीकडे तक्रार केली.

तक्रारीची पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. या पडताळणीदरम्यान तडजोडीनंतर ११ हजार रुपये देण्याचे ठरल्याचे आणि पोळ यांनी पोलीस निरीक्षकांसाठी तसेच स्वतःसाठी ही रक्कम मागितल्याचे एसीबीने नमूद केले आहे. तसेच पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचेही पडताळणीत निष्पन्न झाल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले.

यानंतर २४ सप्टेंबर रोजी सातारा शहरातील राजवाडा परिसरातील जुन्या दवाखान्याजवळ एसीबीने सापळा रचला. पंचांसमक्ष ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार दीपक पोळ यांना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्यावरील आरोपांबाबतही कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा एसीबीच्या पोलीस उपअधीक्षक शैला कोरडे आणि त्यांच्या पथकाने केली.

No comments:

Powered by Blogger.