नेतवडमधील बाल अपहरणाची अफवा ठरली निराधार; मुलं पळवणारी टोळीच नाही - ओतूर पोलिसांचा खुलासा
नेतवडमधील बाल अपहरणाची अफवा ठरली निराधार; मुलं पळवणारी टोळीच नाही - ओतूर पोलिसांचा खुलासा
दहीहंडी कार्यक्रमातील प्रकार; ४० सीसीटीव्ही तपासून महिलेचा शोध.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~कैलास बोडके.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
ओतूर (प्रतिनिधी)नेतवड (ता. जुन्नर) येथे लहान मुलांना पळवणारी टोळी आल्याची सोशल मीडियावर पसरलेली अफवा ओतूर पोलिसांनी खोटी असल्याचे स्पष्ट केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नेतवड येथे दहीहंडी कार्यक्रम सुरू असताना गर्दीच्या ठिकाणी खेळत असलेल्या दीड वर्षाच्या मुलाला एक अनोळखी महिला घेऊन जात असल्याचे मुलाच्या आजीच्या लक्षात आले. आजीने तत्परता दाखवत मुलाला ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधित महिला लाल रंगाच्या चारचाकीतून जुन्नरच्या दिशेने निघून गेली.
या घटनेची माहिती ओतूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर बाजगीरे यांना मिळताच त्यांनी तात्काळ दोन पथके तयार केली. दोन्ही पथकांनी ओतूर, जुन्नर व परिसरातील ४० पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करून संशयित चारचाकीचा शोध घेतला. सदर चारचाकी जुन्नर येथे मिळून आली.
चौकशीत संबंधित महिला जुन्नर येथील रहिवासी असून तिचे नाव आरीफा मुराद व्यापारी (वय ५२) असल्याचे निष्पन्न झाले. नातेवाईकांकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, संबंधित महिलेच्या डोक्यावर परिणाम झाला असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आज सकाळी कोणालाही न सांगता ती घराबाहेर पडली होती आणि योगायोगाने नेतवड येथे नातेवाईक भेटल्याने नातेवाईकांनीच तिला लाल रंगाच्या चारचाकी मधून पुन्हा जुन्नरला नेले.
या घटनेनंतर सोशल मीडियावर बालक अपहरण टोळी आल्याची अफवा पसरली होती, मात्र पोलिस तपासात अशी कोणतीही टोळी नसल्याचे सिद्ध झाले आहे.
लहान मुलांना घरात, वाहनात किंवा सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत एकटे सोडू नये, तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसवावेत, असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगीरे यांनी केले आहे.
सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल , अप्पर पोलीस अधीक्षक शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे,पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, संदीप आमणे, पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, दिनेश साबळे, पोलीस कर्मचारी ज्योतीराम पवार, अमोल शिंदे, राजेंद्र आमले, आशिष जगताप, महिला पोलीस कर्मचारी आकांक्षा साबळे यांनी केली आहे.

No comments: