गणेशोत्सवापूर्वी सांगली पोलिसांचा मोठा धडाका!; कुख्यात 'रितेश कुरणे' टोळी दोन वर्षांसाठी तडीपार.
गणेशोत्सवापूर्वी सांगली पोलिसांचा मोठा धडाका!; कुख्यात 'रितेश कुरणे' टोळी दोन वर्षांसाठी तडीपार.
-------------------------------------
फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र
सांगली प्रतिनिधी
-------------------------------------
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी गुन्हेगार टोळ्यांविरोधात मोठी कारवाई करत महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुख्यात अविनाश ऊर्फ रितेश शिवाजी कुरणे याच्या संपूर्ण टोळीला दोन वर्षांसाठी सांगली जिल्ह्यातून तडीपार केले आहे. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ५५ अंतर्गत हा आदेश जारी केला.
तडीपार करण्यात आलेल्या टोळीत अविनाश ऊर्फ रितेश कुरणे याच्यासह राहील राजू शेख, राजेश चंदू गुजराती आणि लतीफ ख्वाजा शेख या चौघांचा समावेश आहे. या टोळीविरुद्ध २०२२ ते २०२६ या कालावधीत खुनाचा प्रयत्न, पिस्तुलाचा बेकायदेशीर वापर, अपहरण, खंडणी, मारहाण, जीवे मारण्याच्या धमक्या, घातक हत्यारे बाळगणे आणि आर्थिक फसवणूक यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी या टोळीच्या हालचाली, गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि प्रतिबंधक कारवायांचा सविस्तर आढावा घेत सुनावणीनंतर तडीपारीचा निर्णय घेतला. गणेशोत्सवादरम्यान कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि गुन्हेगार टोळ्यांची दहशत संपवण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
सांगली पोलिसांनी इशारा दिला असून, गणेशोत्सवात शांतता भंग करणाऱ्या आणि गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांवर यापुढेही अशाच कडक कायदेशीर कारवाया सुरू राहतील.

No comments: