Header Ads

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दूध उत्पादकांना ७ ग्रॅम चांदीचे नाणे ,आसगाव येथे श्री दत्त महिला दूध संस्थेचा अभिनव उपक्रम; सभासदांच्या योगदानाचा सन्मान

 रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दूध उत्पादकांना ७ ग्रॅम चांदीचे नाणे ,आसगाव येथे श्री दत्त महिला दूध संस्थेचा अभिनव उपक्रम; सभासदांच्या योगदानाचा सन्मान

------------------------

आसगाव प्रतिनिधी

बाजीराव पाटील

९७६६२८५१६५.

----------------------------

आसगाव :- पन्हाळा तालुक्यातील आसगाव येथील श्री दत्त महिला दूध संस्था मर्यादित संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दूध उत्पादक सभासदांना प्रत्येकी सात ग्रॅम वजनाचे चांदीचे नाणे भेट देऊन त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यात आला. संस्थेच्या २५ वर्षांच्या वाटचालीत दूध उत्पादक सभासदांनी दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार चंद्रदीप नरके होते. यावेळी पन्हाळा पंचायत समितीचे सभापती रविंद्र बंडू पाटील तसेच पन्हाळा शिवसेना तालुकाप्रमुख अरुण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक बाजीराव केरबा पाटील यांनी केले.

श्री दत्त महिला दूध संस्थेची स्थापना करून संस्थेच्या प्रगतीचा पाया मजबूत करण्यासाठी संस्थापक अध्यक्ष सुनील मोहन भोसले यांनी केलेल्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादकांना सातत्याने प्रोत्साहन देत त्यांच्या श्रमाला योग्य सन्मान देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

संस्थेच्या चेअरमन विद्या नामदेव भोसले, व्हाईस चेअरमन शोभा राजाराम नाईक, संचालक रूपाली बाजीराव पाटील, सुरेखा नारायण पाटील, रेखा बाजीराव पाटील, माधवी श्रीकांत भोसले, हरुबाई भिकाजी नाईक, सुनंदा दीपक भोसले, सचिव आनंदा दिनकर पाटील तसेच तानाजी दिनकर नाईक यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी ज्येष्ठ नेते केरबा बापू पाटील, भारत पाटील, बाजीराव केरबा पाटील, नारायण पाटील, वसंत नाईक, प्रशांत भोसले, सागर पाटील, महेश भोसले, एकनाथ पाटील, शहाजी पाटील, राजाराम नाईक, उत्तम भोसले, बंटी भोसले, श्रीकांत भोसले, अनिल पाटील सर, युवराज संभाजी पाटील, अनिकेत पाटील व सुकुमार नाईक यांच्यासह दूध उत्पादक सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते.

संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दूध उत्पादकांना देण्यात आलेली सात ग्रॅम चांदीच्या नाण्यांची भेट ही केवळ भेटवस्तू नसून, संस्थेच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या सभासदांच्या श्रमाला आणि विश्वासाला दिलेली 'चांदीची सलामी' असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

No comments:

Powered by Blogger.