शिक्षकदिनी कलेचा अविस्मरणीय सोहळा; ‘श्री आर्ट गॅलरी, अमरावती’ ठरली आकर्षणाचे केंद्र
शिक्षकदिनी कलेचा अविस्मरणीय सोहळा; ‘श्री आर्ट गॅलरी, अमरावती’ ठरली आकर्षणाचे केंद्र.
मयूर खापरे.
----------------------
अमरावती : शिक्षकदिनाचे औचित्य साधून श्री आर्ट गॅलरी, अमरावती यांच्या वतीने आयोजित विशेष कार्यक्रम रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय रांगोळी कलाकार महादेव गोपाळे, मुंबई तसेच सामाजिक कार्यकर्ते दिनेश आमझरे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.
यावेळी श्री आर्ट गॅलरी, अमरावतीचे संस्थापक सारंग नागठाणे यांनी आमदार बच्चूभाऊ कडू व सामाजिक कार्यकर्ते दिनेश आमझरे यांच्या आकर्षक पेंटिंग साकारल्या. कलेतून व्यक्त केलेला स्नेह व आदर म्हणून त्यांनी या प्रतिमा दिनेश आमझरे यांना भेट देत अनोख्या पद्धतीने सन्मान केला.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण आंतरराष्ट्रीय रांगोळी कलाकार महादेव गोपाळे यांनी सादर केलेले रांगोळीचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक ठरले. गोपाळे यांनी आतापर्यंत सुमारे साडेतीन हजार रांगोळ्या साकारल्या असून, स्वित्झर्लंडमध्येही त्यांच्या रांगोळी कलेचे प्रदर्शन झाले आहे. बाळासाहेब ठाकरे, नाना पाटेकर यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्तींच्या प्रतिमा त्यांनी रांगोळीतून साकारल्या आहेत.
महादेव गोपाळे यांच्या कलेचा आदर व्यक्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतः रचलेल्या कविता सादर करून त्यांच्या कलाप्रवासाला सलाम केला. यावेळी गोपाळे यांनी विद्यार्थ्यांना कलेचे महत्त्व सांगत कलागुण जोपासण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
सारंग नागठाणे यांच्या कलाकृतींना संपूर्ण महाराष्ट्रातून मोठी मागणी होत असून, त्यांच्या कलाविष्काराला विविध स्तरांतून उत्स्फूर्त प्रतिसाद व शुभेच्छा मिळत आहेत.
यावेळी आमदार रवी राणा यांच्या हस्ते मूर्तीकला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला शिक्षक, विद्यार्थी व कलाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

No comments: