Header Ads

"पेन्शन द्या... नाहीतर इच्छामरण द्या!" राधानगरीतील १०० शिक्षकांचा सरकारला थेट इशारा; मुंबईवर धडक मोर्चाची रणशिंगे

 "पेन्शन द्या... नाहीतर इच्छामरण द्या!" राधानगरीतील १०० शिक्षकांचा सरकारला थेट इशारा; मुंबईवर धडक मोर्चाची रणशिंगे

२००५ पूर्वी नियुक्त २६ हजार शिक्षकांना जुन्या पेन्शनपासून वंचित ठेवल्याचा आरोप; कोल्हापूरातून शेकडो शिक्षक मुंबई आंदोलनासाठी रवाना होणार.



राधानगरी | प्रतिनिधी : विजय बकरे

"पेन्शन हा आमचा हक्क आहे; भीक नाही!" अशी आक्रमक भूमिका घेत राधानगरी तालुक्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात आरपारच्या लढाईची घोषणा केली आहे. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून शेकडो शिक्षक मुंबईतील राज्यस्तरीय आंदोलनात सहभागी होणार असल्याची घोषणा विनाअनुदानित कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केली.

बाबासाहेब पाटील म्हणाले, "सरकारने तांत्रिक कारणे पुढे करून हजारो शिक्षकांवर अन्याय केला आहे. आता आश्वासन नव्हे, तर हक्काची पेन्शन मिळेपर्यंत संघर्ष सुरू राहील."

मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची मागणी

बैठकीत सर्वाधिक खळबळ उडवणारी बाब म्हणजे राधानगरी तालुक्यातील सुमारे १०० शिक्षकांनी मुख्यमंत्र्यांकडे इच्छामरणाची परवानगी मागितल्याची माहिती. शिक्षक संघटनेच्या म्हणण्यानुसार, काही कर्मचाऱ्यांना पेन्शन मंजूर झाली, मात्र इतरांना अद्याप लाभ नाकारला जात आहे. या कथित अन्यायाविरोधात ही भूमिका घेतल्याचे सांगण्यात आले.

बैठकीला सुरेश संकपाळ, जयसिंग पोवार, विश्वास डोंगळे, संजय तिबिले, एम. आर. पाटील, बिडकर सर, एस. जी. पाटील यांच्यासह तालुक्यातील शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी सर्वांनी "जुनी पेन्शन मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील" असा निर्धार व्यक्त केला.

No comments:

Powered by Blogger.