Header Ads

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पाटील यांचा अंजनी ते तासगाव पायी प्रवास.

 दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पाटील यांचा अंजनी ते तासगाव पायी प्रवास. निसर्गाच्या प्रकोपामुळे  हवालदील झालेल्या शेतकऱ्यांसाठी गणरायाच्या चरणी करणार  प्रार्थना.



तासगाव : प्रतिनिधी

दुष्काळाच्या झळांनी शेतकरी हवालदिल झाला आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे, शेतीसाठी विजेची चिंता कायम आहे, तर मुक्या जनावरांसमोर चारा-पाण्याचे संकट उभे ठाकले आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकरी आणि पशुधनावरील संकट दूर व्हावे, यासाठी तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित आर. आर. पाटील हे अंजनी ते तासगाव असा पायी प्रवास करीत गणरायाकडे साकडे घालणार आहेत.

मंगळवार, दि. १५ सप्टेंबर रोजी सकाळी ६ वाजता अंजनी येथून या पायी प्रवासाला सुरुवात होणार आहे. तासगाव येथील ऐतिहासिक श्री गणपती मंदिराच्या रथोत्सवानिमित्त हा प्रवास आयोजित करण्यात आला आहे.

मतदारसंघातील ग्रामीण भागात पाणी, वीज आणि शेतीशी संबंधित प्रश्नांबरोबरच पशुधनासाठी चारा-पाण्याची उपलब्धता हा गंभीर विषय बनला आहे. निसर्गाच्या लहरीपणाने शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर दुष्काळाचे सावट दूर व्हावे, कोरड्या पडलेल्या शिवारात पुन्हा हिरवाई फुलावी आणि मुक्या जीवांना चारा-पाणी मिळावे, यासाठी आमदार रोहित पाटील गणरायाच्या चरणी साकडे घालणार आहेत.

अंजनीपासून सुरू होणारा हा पायी प्रवास तासगावच्या ऐतिहासिक श्री गणपती मंदिरात पोहोचेल. रथोत्सवाच्या मंगलमय वातावरणात गणरायाचे दर्शन घेत दुष्काळग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळावा, त्यांच्या शिवारात पुन्हा समृद्धी नांदावी आणि तासगाव-कवठेमहांकाळसह संपूर्ण महाराष्ट्रावरील दुष्काळाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना केली जाणार आहे.

दुष्काळाच्या संकटात प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा असतानाच, गणरायाच्या चरणी घातले जाणारे हे साकडे शेतकरी आणि ग्रामीण जीवनाशी जोडलेल्या वेदनांना भावनिक स्वर देणारे ठरणार आहे.


चौकट : गणरायाकडे साकडे...

शिवार पुन्हा हिरवेगार होऊ दे, पाण्याचे संकट दूर होऊ दे, शेतीला पुरेशी वीज मिळू दे, मुक्या जीवांना चारा-पाणी मिळू दे आणि शेतकरी कुटुंबांच्या जीवनात पुन्हा सुख-समृद्धी नांदू दे... यासाठी गणरायाच्या चरणी साकडे घालण्यात येणार आहे.

No comments:

Powered by Blogger.