Header Ads

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचा भोंगळ कारभार? नेत्र विभागातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया बंद असल्याचा आरोप; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा

 अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयाचा भोंगळ कारभार? नेत्र विभागातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया बंद असल्याचा आरोप; वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा.


-----------------------------------------------

अमरावती | प्रतिनिधी : पी. एन. देशमुख.

-----------------------------------------------

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र विभागामधील मोतीबिंदू शस्त्रक्रिया बंद असल्याचा आरोप करत रुग्णसेवक सुरेशभाऊ तायडे यांनी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा शल्यचिकित्सकांवर गंभीर आरोप केले आहेत. या संदर्भात त्यांनी प्रसिद्धीपत्रक जारी करून तात्काळ मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.

तायडे यांच्या म्हणण्यानुसार, नेत्र विभागाचा वार्ड बंद करून तेथे वार्ड क्रमांक १६ मधील रुग्णांना हलविण्यात आले आहे. त्यामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत असून अनेक रुग्ण उपचाराविना परत जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नेत्र विभागातील ऑपरेशन थिएटर आणि कोट्यवधी रुपयांची यंत्रसामग्री अशा ठिकाणी संसर्गजन्य रुग्ण हलविल्याने धोक्यात आली आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या रुग्णांची पर्यायी व्यवस्था कुठे करण्यात आली, याचे उत्तर प्रशासनाने द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

याप्रकरणी जिल्हा आरोग्य यंत्रणेचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालावे आणि नेत्र विभागातील मोतीबिंदू शस्त्रक्रिया व ऑपरेशन थिएटर त्वरित सुरू करावे, अशी मागणी प्रसिद्धीपत्रकात करण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीचा इशारा

मोतीबिंदू शस्त्रक्रिया तातडीने सुरू न झाल्यास वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात 'झोपा आंदोलन' करण्यात येईल, असा इशारा रुग्णसेवक सुरेशभाऊ तायडे यांनी दिला आहे.

No comments:

Powered by Blogger.