राधानगरीत घरफोड्या-चोऱ्यांचे सत्र; पोलीस सतर्क, नागरिकांना ग्रामसुरक्षा दल उभारण्याचे आवाहन!
राधानगरीत घरफोड्या-चोऱ्यांचे सत्र; पोलीस सतर्क, नागरिकांना ग्रामसुरक्षा दल उभारण्याचे आवाहन!
रात्री घरात झोपलेले असतानाही चोरट्यांचा शिरकाव; दागिने-रोकड सुरक्षित ठेवा, राधानगरी पोलिसांचा नागरिकांना सावधानतेचा इशारा!
राधानगरी | प्रतिनिधी
राधानगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विविध गावांमध्ये अलीकडच्या काळात घरफोड्या आणि चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राधानगरी पोलिसांकडून करण्यात आले आहे. नागरिक घरात झोपलेले असतानाही चोरट्यांनी घरात शिरून चोरी केल्याच्या घटना घडल्याने गावोगावी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तसेच तांब्याच्या कॉपर वाइंडिंगच्या चोरीच्याही घटना समोर येत आहेत.
गावोगावी ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याचे आवाहन!
राधानगरी पोलीस ठाण्याकडून दोन वाहनांच्या माध्यमातून संपूर्ण हद्दीत गस्त घातली जात आहे. मात्र, पोलीस ठाण्याची हद्द मोठी असल्याने प्रत्येक गावात आणि परिसरात सतत गस्त घालण्यात अडचणी येतात. त्यामुळे गावातील तरुणांनी पुढाकार घेऊन ग्रामसुरक्षा दल स्थापन करावे, तसेच रात्रीच्या वेळी गावात आणि परिसरात गस्त घालावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आणि पोलीस पाटील यांनी बैठक घेऊन ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करावी व त्यांच्यामार्फत रात्रीची गस्त नियमितपणे घालावी, अशी विनंती राधानगरी पोलिसांनी केली आहे.
🔴 नागरिकांनी या खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात!
🔹 घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि मौल्यवान दागिने ठेवू नयेत. सोन्याचे दागिने बँकेच्या लॉकरमध्ये, तर रोख रक्कम सुरक्षित ठिकाणी ठेवावी.
🔹 बाहेरगावी जाताना शेजाऱ्यांना आणि राधानगरी पोलीस ठाण्याला माहिती द्यावी.
🔹 घराचे दरवाजे, कडी-कोयंडे आणि कुलूप मजबूत असल्याची खात्री करावी.
🔹 रात्री झोपताना दरवाजे आतून व्यवस्थित बंद व लॉक करावेत. दरवाजा केवळ ढकलून किंवा अर्धवट बंद ठेवून झोपू नये.
🔹 गावापासून दूर असलेली घरे आणि शेतातील घरांमध्ये राहणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी.
🔹 गावात किंवा परिसरात संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाली आढळल्यास तातडीने पोलिसांना कळवावे.
पोलिसांचे नागरिकांना आवाहन.
चोरीच्या घटना रोखण्यासाठी केवळ पोलिसांवर अवलंबून न राहता नागरिकांनीही सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. ग्रामसुरक्षा दल, नियमित रात्रीची गस्त आणि नागरिकांचा सहभाग यांच्या माध्यमातून गावांची सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे आवाहन राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.
सतर्क नागरिक, सुरक्षित गाव — चोरी रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज!

No comments: