महाराष्ट्राच्या हवाई वाहतुकीला नवी भरारी! अमरावती–पुणे, सोलापूर–मुंबई हवाई मार्गांची उडान योजनेत निवड
महाराष्ट्राच्या हवाई वाहतुकीला नवी भरारी! अमरावती–पुणे, सोलापूर–मुंबई हवाई मार्गांची उडान योजनेत निवड.
अमरावती | पी. एन. देशमुख, जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रादेशिक हवाई वाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेअंतर्गत अमरावती–पुणे आणि सोलापूर–मुंबई या दोन हवाई मार्गांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली.
या हवाई मार्गांमुळे विदर्भ आणि सोलापूर परिसरातील नागरिकांना महानगरांशी थेट हवाई संपर्काची संधी उपलब्ध होणार आहे. परिणामी विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी आणि नोकरदारांचा प्रवास अधिक जलद होण्यासह व्यापार, पर्यटन आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर या मार्गांवर व्यावसायिक विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रातील प्रादेशिक दळणवळण मजबूत करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

No comments: