Header Ads

परळीतील महावितरणचा कारभार रामभरोसे! शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; कमी व्होल्टेजचा प्रश्न कायम

 परळीतील महावितरणचा कारभार रामभरोसे! शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष; कमी व्होल्टेजचा प्रश्न कायम

ना जंप मारण्याची कार्यवाही, ना टॅपिंग; मग कमी दाबाचा वीजपुरवठा सुधारणार तरी कसा? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल!

परळी | प्रतिनिधी – अमर इंदलकर

परळी परिसरातील शेतकरी महावितरणच्या कारभाराला अक्षरशः वैतागले असून, कमी व्होल्टेजच्या समस्येमुळे शेतीपंप चालवणे कठीण झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून दखल घेतली जात नसल्याचा गंभीर आरोप शेतकरी करत आहेत.

कमी व्होल्टेजची समस्या दूर करण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक तांत्रिक कामे, जसे की जंप मारणे, टॅपिंग करणे तसेच वीजवाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मरची तपासणी करणे, याबाबतही प्रत्यक्ष कार्यवाही होत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.

एकीकडे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाण्याची गरज आहे, तर दुसरीकडे कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे मोटारी बंद पडणे, गरम होणे आणि जळण्याचे प्रकार घडण्याची भीती आहे. मोटार जळाल्यास हजारो रुपयांचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. याची जबाबदारी नेमकी कोण घेणार?

महावितरणकडून वीजबिल वसुलीसाठी तत्परता दाखवली जाते; मात्र शेतकऱ्यांच्या मूलभूत तक्रारी सोडवण्यासाठी तीच तत्परता का दाखवली जात नाही? शेतकऱ्यांनी वारंवार कार्यालयाचे उंबरठे झिजवायचे आणि तरीही समस्या कायम राहायची, ही परिस्थिती किती दिवस सहन करायची?

महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना थेट सवाल

परळी परिसरातील कमी व्होल्टेजची समस्या दूर करण्यासाठी अद्याप ठोस कार्यवाही का नाही?

जंप मारणे, टॅपिंग करणे यांसारखी आवश्यक कामेही का केली जात नाहीत?

संबंधित विद्युत वाहिन्या आणि ट्रान्सफॉर्मरची तांत्रिक तपासणी कधी होणार?

शेतकऱ्यांच्या तक्रारींची दखल न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चित होणार का?

कमी व्होल्टेजमुळे मोटारींचे नुकसान झाल्यास भरपाई कोण देणार?

शेतकऱ्यांची मागणी आहे की, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परळी परिसरातील वीजपुरवठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने तांत्रिक कामे पूर्ण करावीत आणि कमी व्होल्टेजचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा. शेतकऱ्यांना केवळ आश्वासने नकोत, प्रत्यक्ष कृती हवी!

No comments:

Powered by Blogger.