कळे येथील सुपुत्राला राज्यशास्त्रात पीएच.डी. डॉ. निवास पाटील यांचे वारणा सहकारी उद्योग समूहावरील संशोधन ठरले दिशादर्शक
कळे येथील सुपुत्राला राज्यशास्त्रात पीएच.डी.
डॉ. निवास पाटील यांचे वारणा सहकारी उद्योग समूहावरील संशोधन ठरले दिशादर्शक.
कळे प्रतिनिधी
साईश मोळे
९५९५३१६२६६
कळे:- शैक्षणिक, सामाजिक आणि सहकार क्षेत्रासाठी अभिमानाची बातमी आहे. पन्हाळा तालुक्यातील कळे गावचे सुपुत्र डॉ. निवास गणपतराव पाटील यांना कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून राज्यशास्त्र विषयामध्ये पीएच.डी. (विद्यावाचस्पती) ही सर्वोच्च पदवी प्रदान करण्यात आली आहे.
त्यांच्या या यशामुळे कळे गावासह पन्हाळा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
डॉ. निवास पाटील यांनी 'कोल्हापूर जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील वारणा उद्योग समूहाच्या योगदानाचा चिकित्सक अभ्यास'* या विषयावर आपला प्रबंध सादर केला.
यासंशोधनात त्यांनी केवळ वारणा उद्योग समूहाचा इतिहास मांडला नाही, तर वारणा समूहाने कोल्हापूर जिल्ह्याच्या जडणघडणीत दिलेल्या अमूल्य योगदानाचा सखोल आणि अभ्यासपूर्ण आढावा घेतला आहे.
त्यांच्या संशोधनात प्रामुख्याने पुढील मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे :
- सहकारातून ग्रामीण भागात झालेले औद्योगिक क्रांतीचे पर्व
- वारणा उद्योग समूहामुळे झालेला ग्रामीण भागाचा आर्थिक कायापालट
- महिला सक्षमीकरण आणि युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर झालेली रोजगार निर्मिती
- शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात वारणाने घडवलेले परिवर्तन
हा संशोधन ग्रंथ भविष्यात सहकार क्षेत्रावर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधकांसाठी एक संदर्भ ग्रंथ म्हणून उपयोगी ठरणार आहे.
डॉ. निवास पाटील हे एका प्रतिष्ठित आणि सामाजिक वारसा असलेल्या कुटुंबातील आहेत. ते कळे गावचे माजी सरपंच, अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती *दिवंगत लोकनेते भगवान मामा* यांचे नातू असून, माजी जिल्हा परिषद सदस्य *दिवंगत जी. बी. पाटील (नाना)* यांचे चिरंजीव आहेत.
सध्या ते धर्मराज विकास सेवा संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत असून, शिक्षण, सहकार आणि संशोधन क्षेत्रात त्यांचे मोलाचे कार्य सुरू आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक, सहकार क्षेत्रातील मान्यवर, शिक्षण क्षेत्रातील जाणकार, मित्रपरिवार आणि कळे गावातील ग्रामस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments: