अमरावतीत पतीच्या संशयाचा रक्तरंजित शेवट! पत्नीचा दुपट्ट्याने गळा आवळून खून; आरोपी पती अटकेत.
अमरावतीत पतीच्या संशयाचा रक्तरंजित शेवट! पत्नीचा दुपट्ट्याने गळा आवळून खून; आरोपी पती अटकेत.
अबूबकर कॉलनीत खळबळ; प्लॉटच्या वादातून आणि चारित्र्यावरील संशयातून हत्या केल्याचा आरोप.
अमरावती | जिल्हा प्रतिनिधी : पी. एन. देशमुख
अमरावती शहरातील अबूबकर कॉलनीत पत्नीच्या चारित्र्यावर संशय आणि प्लॉटच्या वादातून पतीनेच पत्नीचा दुपट्ट्याने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नसरीन बानो पठाण (वय ४८) असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणातील आरोपी पती रफी उल्ला खान पठाण (वय ५२) याला गाडगेनगर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, बुधवारी दुपारी १२ ते ३ वाजण्याच्या दरम्यान पती-पत्नी घरात असताना ही घटना घडल्याचा संशय आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावून पलायन केल्याचे समोर आले आहे.
सायंकाळी मुले शाळा व महाविद्यालयातून घरी परतली असता घराला कुलूप असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आई-वडील बाहेर गेले असावेत, असे समजून मुले शेजारील नातेवाइकांकडे थांबली. मात्र, रात्री सुमारे १० ते १०.३० वाजण्याच्या सुमारास कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता बेडरूममधील पलंगावर नसरीन बानो यांचा मृतदेह आढळून आला. त्यांच्या गळ्याभोवती दुपट्टा असल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर मृत महिलेच्या भावाच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. गुरुवारी पहाटे गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
चारित्र्यावरील संशय आणि मालमत्तेचा वाद जीवघेणा ठरल्याच्या या घटनेने अमरावती शहरात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

No comments: